दोषींवर कठोर कारवाई होईल

0

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी नड्डा यांनी गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली. रविवारी या रुग्णालयातील एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील एकूण मृतांचा आकडा 72 वर गेला आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी चिमुरड्यांना जीव गमवावा लागला आहे.

मोदींनी केंद्रातून मदत पाठवली
योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले, बालकांच्या मृत्यूंमुळे अत्यंत वेदना झाले. बाबा राघव दास रुग्णालयातील घटनेमुळे पंतप्रधान मोदी अतिशय चिंतेत आहेत. या प्रकरणात मोदींकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. बालकांच्या मृत्यूंची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. बाबा राघव दास रुग्णालयातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केंद्रातून मदत पाठवली आहे, असे आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.

केंद्राकडून सर्वोतोपरी मदत
बाबा राघव दास रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणी केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जात असून त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला आहे. मी चौथ्यांदा या रुग्णालयात आलो आहे. त्यामुळे कोणीही या समस्येचे गांभीर्य माझ्यापेक्षा अधिक कोणीही समजू शकत नाही, असेही आदित्यनाथ यांनी पत्रकारांना सांगितले.

हे खुनी सरकार
लहान मुलांचे जे मृत्यू झाले आहेत त्यामध्ये आता सरकार काय शोधणार आहे? हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले आहेत, रूग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे झाले आहेत हे योगी आदित्यनाथांनी मान्य करावे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. आदित्यनाथ ज्या रूग्णालयाचा दौरा करून जातात तिथे अशी दुर्घटना होऊच कशी काय शकते?
-राज बब्बर, काँग्रेस नेते