दोषी भाजपचे असले तरी कारवाई होणार

0

मुंबई:- नागपूर येथे गोमांस बाळगल्याप्रकरणी मारहाणीच्या घटनेने वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान गोमांस बाळगणे हा गुन्हा आहे आणि यात सहभागी भाजपचा कार्यकर्ता जरी असेल तरी कारवाई करू तसेच गोरक्षणाच्या नावाखाली विनाकारण निर्दोष व्यक्तींना मारहाण प्रकरणातील आरोपीही कुठल्याही पक्षाचे असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. आमच्या पार्टीतला असो किंवा इतर कुठल्या पक्षातील असो, जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणे आवश्यक असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
१२ जुलै रोजी सलीम इस्माईल शहा हा गोमांस नेत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांंनी त्याला अडवून नागपूरात मारहाण केली. गोमांस आणि मारहाणीचे लोण वाढत चालले असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सलीम हा भाजप कार्यकर्ता असल्याचे समोर आल्यानंतर भाजपातील काहींनी या घटनेचा निषेध केला होता तर काहींनी त्याला पक्षातून काढून टाकले असल्याचे सांगितले होते.

भाजपचा कार्यकर्ता म्हणजे माणूसच आहे. त्याला गोरक्षणाच्या नावाखाली अशी मारहाण होणे ही घटना निंदनीय आहे. अशा घटनांवर अंकुश येणे आवश्यक आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की दहशतीचे? असा प्रश्न उपस्थित होतोय.
आ. जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेस

तथाकथित गोरक्षकांची दादागिरी वाढत चालली असून यामुळे देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून कायदाव्यवस्था इथे आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.
आ. वारीस पठाण
एमआयएम