दोष डॉ. मेधा खोलेंचा नाही ब्राह्मणी धर्माचा आहे

0

डॉ. मेधा खोले यांच्या म्हणण्यानुसार, त्या स्वतः ब्राह्मण आहेत आणि त्यांना सोवळ्यातली ब्राह्मण बाईच स्वयंपाकाला हवी होती. निर्मलाताई यादव यांची जात कळल्यावर त्यांना धक्का बसला. निर्मलाताई जातीने मराठा आहेत. मराठा बाईने ब्राह्मणाच्या घरात स्वयंपाक केला. त्यामुळे त्यांचं घर, त्यांचा गणपती आणि त्यांचे पितर सगळेच बाटले होते.
डॉ. खोले बाईंचे तीन आक्षेप आहेत.

1. त्यांना सोवळ्यातली बाई हवी होती.
2. त्यांना सुवासिनी (सवाष्ण) बाई हवी होती. (पती हयात असणारी)
3. त्यांना धर्माने ब्राह्मण बाई हवी होती.

निर्मला यादव यांनी या तिन्ही गोष्टी मोडल्या. पती हयात नसणारी म्हणजे विधवा बाई. तिचा हातचा स्वयंपाक कसा चालणार? त्यात निर्मलाताई जातीने मराठा. म्हणजे ब्राह्मणी धर्मानुसार शुद्र. (परशुराम आणि कर्णाची गोष्ट आठवत असेल. कर्ण क्षत्रिय म्हणवत होता. पण तो ब्राह्मणी धर्मानुसार शुद्रच. म्हणून परशुराम खवळला होता.) पुन्हा बाई सोवळ्यातली नाही. यावर इथे लिहिणंही प्रशस्त नाही.

ही घटना महात्मा जोतीराव फुले यांच्या काळातली नाही. ब्राह्मण विधवांचं केशवपन थांबवण्यासाठी फुलेंनी महाराष्ट्रातल्या नाभिकांना संपाची हाक दिली, तेव्हाची ही घटना नाही. विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या टाकून दिलेल्या मुलांसाठी फुले दाम्पत्याने देशातलं पहिलं बालगृह उघडलं, त्या काळातली ही घटना नाही. ही घटना सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत शिकवायला जात होत्या तेव्हाची नाही. सावित्रीबाईंच्या शाळेत ब्राह्मण, मराठा, माळी, मांग, महार अशा सर्व जातींच्या मुली पहिल्यांदा शिकायला लागल्या होत्या, तेव्हाची ही गोष्ट नाही.

ही घटना वेदोक्त प्रकरण गाजत होतं त्यावेळचीही नाही. शाहू महाराज शूद्र आहेत म्हणून नारायण भटाने वेदोक्त मंत्र म्हणायला नकार दिला. महाराजांना माहीत नव्हतं. पण शाहू महाराजांचे मित्र असलेले प्रख्यात प्राच्य विद्या पंडित राजाराम शास्त्री भागवत यांनी ते ओळखलं. त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. तेव्हा नारायण भटाने कांगावा केला. वेदोक्त प्रकरणात आणि ताई महाराज प्रकरणात खुद्द लोकमान्य टिळक शाहू महाराजांच्या विरोधात उभे राहिले. तेव्हाचा हा प्रसंग नाही. ही घटना विश्‍वविख्यात विद्यापीठांतून शिक्षण घेऊन बडोद्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही काळातली नाही. बाबासाहेबांचा स्पर्शही नको म्हणून त्यांचा सोवळं पाळणारा शिपाई त्यांची फाइल टेबलावर दूरून टाकत होता. हिंदू स्त्रियांना अधिकार देणार्‍या हिंदू कोड बिलाचा आग्रह बाबासाहेब धरत होते, तेव्हाचंही हे प्रकरण नाही. ही घटना साने गुरुजी श्यामची आई लिहित होते त्यावेळचीही नाही. एका पूर्वास्पृश्य म्हातार्‍या बाईची मोळी तिच्या डोक्यावर चढवून दे, असं छोट्या श्यामला त्याची आई सांगत होती. त्या काळातली ही घटना नाही. पंढरपूरला साने गुरुजी प्राणांतिक उपोषण करत होते. पण बडवे पुरोहित पंढरीच्या विठ्ठलाला विटाळ होईल म्हणून पूर्वी स्पृश्यांना प्रवेश द्यायला नाकारत होते. त्यादरम्यानची ही घटना नाही.

ही घटना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा स्त्रीशी विवाह केला त्या काळातलीही नाही. या देशातली अस्पृश्यता, जातीभेद, शिवाशिव, वर्णभेद, धर्मभेद संपुष्टात आणणारे भारतीय संविधान लागू होऊन 67 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या काळातली ही घटना आहे. मंगळ यान मंगळावर पोहोचलं, त्यानंतरची ही घटना आहे. हवामान खात्याचा अंदाज आताशा अचूक निघतो म्हणून खुद्द बारामतीकरांना साखर वाटावी लागली. त्या हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्या घरातला गणपती आणि त्यांचे पितर मराठा बाईच्या स्पर्शाने बाटले होते. शेतकर्‍याने पिकवलेलं अन्नधान्य चालतं. पण कुणब्याच्या घरातल्या बाईने शिजवलेलं अन्न चालत नाही, ही काय भानगड आहे?

हा प्रश्‍न अंधश्रद्धेचा किंवा पारंपरिक समजुतींचा म्हणून सोडून दिला, तर मोठी चूक ठरेल. वैदिक ब्राह्मणांना स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे होत असताना पुण्यातल्या या घटनेकडे पाहिले पाहिजे. वैदिक ब्राह्मण धर्म हा प्राचीन आणि स्वतंत्र धर्म आहे यात शंका घेण्याचं काही कारण नाही. म्हणून तर खोले बाईंच्या ’धार्मिक भावना’ दुखावल्या. भारतात ब्राह्मण आणि श्रमण या दोन स्वतंत्र धर्म परंपरा आहेत. जैन आणि बौद्ध हे धर्म श्रमण परंपरेतूनच उदयाला आले. शैव, शाक्त, लिंगायत या धर्म परंपरा त्याच श्रमण परंपरेतून विकसित झाल्या. भारताला ओळख मिळवून देणार्‍या सम्राट अशोकाच्या एका शिलालेखावर या देशातील ब्राह्मण आणि श्रमण या दोन स्वतंत्र धर्म परंपरांचा स्पष्ट शब्दात उल्लेख आहे. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. मात्र, त्याचं राज्य धर्मनिरपेक्ष होतं. शिलालेखावरचा त्याचा आदेश म्हणतो, ’(अशोकाचं) राज्य ब्राह्मण आणि श्रमण या दोघांनाही समान सन्मान देतं.’

अशोकाचं हे धर्मनिरपेक्ष राज्य त्या वेळच्या पुरोहित वर्गाला मान्य नव्हतं. चाणक्याने निवडलेला चंद्रगुप्त हा ब्राह्मणी धर्मानुसार शुद्र होता. चाणक्य विचाराने आणि निष्ठेने चार्वाक लोकायतवादी होते. त्यांनी त्यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ बळीराजाचे गुरू शुक्राचार्य आणि लोकायतचे प्रवर्तक आचार्य बृहस्पती यांना अर्पण केला होता. आचार्य चाणक्यांचा पुढे काटा काढण्यात आला आणि अशोकाच्या पणतू बृहद्रथ याची हत्या करत पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृतीचं राज्य स्थापन केलं. चाणक्याचं अर्थशास्त्र नावाचं संविधान बदलून मनुस्मृती नावाचं नवं संविधान पुष्यमित्र शुंगाच्या काळात रचलं गेलं. त्याच्या राजवटीत सगळ्या उदार परंपरांवर नांगर फिरवण्यात आला. पुढची अनेक वर्षे तो संघर्ष चालत राहिला. त्या संघर्षात या सगळ्या परंपरा पोटात घेत वैदिक ब्राह्मण धर्माने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तेव्हा तो सगळा समाज पुढे हिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला.

हिंदू ही मुळात भौगोलिक ओळख आहे. तो काही स्वतंत्र धर्म नव्हता. मनुस्मृती हे त्याचं काही धर्मशास्त्र नाही. हिंदू समाजातल्या असंख्य उदार परंपरा मनुस्मृतीला मानत नाहीत. अगदी वेदांनाही नाही. वेदांचा तो अर्थ आम्हासी ठाऊक, असं म्हणणार्‍या संत तुकारामांपर्यंतच्या सगळ्या संतांच्या यावरच्या भूमिका अगदी स्पष्ट आहेत. एकनाथांपासून नामदेवांपर्यंत, गोरखनाथांपासून निवृत्तीनाथांपर्यंत, बसवेश्‍वरांपासून नानक देवजींपर्यंत, संत कबीर असोत की मीरा अन् रविदास या सर्वांनी आपल्या उदार समतावादी पताका स्वतंत्रपणे फडकवत ठेवल्या. मनुस्मृती हे ब्राह्मणी धर्माचं धर्मशास्त्र आहे. सोवळं-ओवळं, भेदाभेद, मंगल-अमंगल, शिवाशिव ही या धर्मशास्त्राची फळं आहेत. जाती घट्ट होत गेल्या तशा या कल्पनाही घट्ट होत गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसं, ’ब्राह्मण्यं ही काही ब्राह्मणांचीच मक्तेदारी राहिली नाही. प्रत्येक जात आपल्यापेक्षा दुसर्‍या जातीला खालची मानते किंवा दुसर्‍या पेक्षा स्वतःला वरची किंवा स्वतःला खालची मानते. तेव्हा ते त्या त्या जातीतलं ब्राह्मण्य असतं.’ ब्राह्मणी धर्माचा संस्कार भारतीय समाजाच्या नेणीवेत किती घट्ट रुजला आहे हे कोणत्याही जातीतल्या माणसाचा दुसर्‍या जातीशी असलेला व्यवहार तपासला की सहज लक्षात येतं. केवळ ब्राह्मण जातीत जन्मलेला म्हणून तो ब्राह्मणी धर्माचा पाईक असा अर्थ काढणं बरोबर नाही. ब्राह्मणी धर्माविरोधात ब्राह्मण जातीत जन्मलेल्या अनेकांनी बंड केलेलं आहे. आचार्य बृहस्पती, शुक्राचार्य यांच्यापासून ते महात्मा बसवेश्‍वर ते अलीकडच्या काळात राजारामशास्त्री भागवत यांच्यापर्यंत अनेकांनी ब्राह्मणी धर्माविरोधात मानवी धर्माचा उच्चार केलेला आहे.

दोष डॉ. मेधा खोलेंचा नाही. त्या हवामान शास्त्रज्ञ होत्या की तंत्रज्ञ? विज्ञानाने विकसित केलेलं तंत्रज्ञान त्या जरुर शिकल्या असतील. मंगळ यान प्रक्षेपित करण्यापूर्वी पूजा करणार्‍या बाकीच्या भारतीय शास्त्रज्ञांप्रमाणे त्यांनीही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेला नाही. त्यांच्या नेणीवेत घट्ट रुजलेल्या ब्राह्मणी धर्माचा संस्कार निर्मला ताईंची जात कळताच स्फोट व्हावा तसा बाहेर पडला. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना शुद्र ठरवण्यात आलं. राज्याभिषेक नाकारण्यात आला. त्यांना गागाभट्टांना आणावं लागलं. गागाभट्टांनाही शाप देण्यात आले. म्हणून शौचकुपात त्यांचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. (की मारण्यात आलं.) शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण मागच्या शतकातलं. शंभर वर्षांनंतरही निर्मलाताई यादव शूद्र ठरल्या. डॉ. मेधा खोले यांनी आता आपली तक्रार मागे घेतली आहे. या घटनेची राजकीय किंमत आपल्याला द्यावी लागेल हे चलाख राज्यकर्त्यांनी ओळखलं. त्यांनी बरीच धावपळ केली. तक्रार मागे घेतल्याने वादावर पडदा पडेल? पुणे पोलिसातल्या त्या तक्रारीने प्राचीन जखमेवरची खपली निघाली. जखम अजून खोल आहे. तक्रार मागे घेण्याच्या बँडेडने जखम झाकली जाईल?

-कपिल पाटील
आमदार, महाराष्ट्र विधानपरिषद

kapilhpatilgmail.com