दोस्त दोस्त ना रहा!

0

तेहरान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीचे नवे पर्व सुरु होत असतानाच, भारताचा सर्वात जुना मित्र इराण मात्र नाराज झाल्याचे दिसते. इराणने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन भारताला चिमटा काढला. जगभरातील मुस्लिमांनी बहारिन, काश्मीर आणि येमेनमधील जनतेला अत्याचारी हुकूमशहांविरोधात साथ द्यावी असे आवाहन इराणमधील सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खोमेनी यांनी केलेे. खोमेनी यांच्या विधानामुळे भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये कटूता आणखी वाढण्याची शक्यता आहे. खोमेनी यांनी काश्मीरचा उल्लेख करत मुस्लीम देशांचा मुद्दा उपस्थित करणे, तसेच अप्रत्यक्षरित्या भारताला शोषक म्हणणे भारताला आवडलेले नाही. भारताकडून या वक्तव्याचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

म्हणे, भारताविरोधात मुस्लिमांनी एकत्र यावे!
भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कच्चा तेलाचा पुरवठा आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरुन तणाव निर्माण झाला आहे. यात भर म्हणजे आता खोमेनी काश्मीरचा मुद्दा मांडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी खोमेनी यांनी ट्विट करुन भारतावर निशाणा साधला. खोमेनी म्हणाले, बहारिन, काश्मीर आणि येमेनमधील मुस्लिमांच्या समर्थनार्थ सर्व मुस्लिमांनी पुढे येणे गरजेचे आहे. रमजानच्या काळात मुस्लिमांवर हल्ले करणार्‍या या भागांमधील अत्याचारी हुकूमशहांना हद्दपार केले पाहिजे, अशी टीका खोमेनी यांनी केली. ईदच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या भाषणात खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केलेे. या सर्वांचा एकच शत्रू असल्याचेही ते यावेळी बोलले. त्यांनी सौदी अरब, सुन्नी अरब आणि भारताला एकाच पंक्तीत आणून बसवले आहे.

भारत-इराणचे संबंध बिघडले
अयातुल्ला खोमेनी यांचा काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिमांचे लक्ष भारताकडे खेचण्याचा उद्देश असू शकतो. भारत आणि इराणमध्ये नेहमी मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत. मात्र इराणचा भारताच्या बाबतीत नेहमीच संमिश्र दृष्टीकोन राहिला आहे. अनेक प्रकरणांमध्ये इराण तटस्थ राहिला तर अनेक वेळा त्यांनी भारतविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरचा उल्लेख करण्याचे दुसरे एक कारण असण्याची शक्यता म्हणजे, भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध. दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंध चांगले होत असल्याने इराणने काश्मीरचा विषय काढला असण्याची शक्यता आहे.