दौंडमधील बटेवाडी, गार गावाकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था

0

यवत । दौंड तालुक्यातील बेटवाडी आणि गार गावाकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था बिकट झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेने दीड वर्षापूर्वी हा रस्ता बांधला होता. तरीही या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. ठेकेदार आणि सरकारी यंत्रणेने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप बेटवाडीगावच्या ग्रामस्थांनी केला आहे.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रामधील सर्व राज्य आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या रस्त्याची दुरुस्तीची कामे करण्यात येतील, असे जाहीर केले होते. पण, डिसेंबर महीन्याच्या शेवट झाला तरी या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. रस्त्याची दयनीय परिस्थिती असतानाही जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी रस्त्याची मलमपट्टी करण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च होऊनही या खड्ड्यांचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या आजारी व्यक्तीला घेऊन जाताना प्रचंड त्रास आणि अडथळे पार करत जावे लागत आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाल्यामुळे वाहने चालवणे कठीण झाले आहे. या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि स्थानिक जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते यांच्याकडे करत आहेत.

रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
बेटवाडी गाव, नवीन आणि जुने गार, येडेवस्ती, सुर्वे वस्ती, होलेमळा या गावांकडे जाण्यासाठी हा सात किलोमीटरचा रस्ता आहे. बेटवाडीपासून तीन किलोमीटरवर येडेवस्ती आणि पाच किलोमीटरवर गार असून मधोमध सुर्वेवस्ती गावाची वस्ती आहे. एकूण आठ हजार लोकवस्ती असलेले हे गाव आहे. या गावाची मुख्य बाजार पेठ दौंड आहे. 2009-10 मध्ये बेटवाडी फटा ते गारपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मंजूर केले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदारांनी केवळ बीबीएम डांबरीकरण करून रस्त्यावरील खड्डे कमी करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या आठ वर्षापासून या रस्त्याची देखभाल करण्यात आली नसल्याचे गार गावचे सरपंच सुमन कांबळे यांनी सांगितले. बेटवाडी फाटा ते गारपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे लवकर बुजवावेत, रस्त्यासाठी नव्याने निधी मंजूर करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.