दौंडमधील 11 गावांचा ‘पेयजल’मध्ये समावेश

0

यवत । दौंड तालुक्यातील 11 गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या टप्पा 2 मध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी दिली. राज्यातील ग्रामीण भागातील प्रलंबित पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचा बंद पडलेल्या योजनांसंदर्भात विधानसभेत अर्धातास चर्चा उपस्थित केली होती तेव्हा ते बोलत होते.

2015 पूर्वी राज्यातील अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्या परंतु सन 2015 नंतर राज्यातील फ्लोराईड बाधित व संसद आदर्शग्राम वगळता इतर गावातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी करण्याची अनुमती राज्यशासनाने दिली नाही, त्यामुळे राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना हा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. टप्पा एक व दोनच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्याचा मनोदय शासनाने आखला आहे. राज्यातील 1003 गावांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. परंतु 3 हजार ग्रामपंचायती या योजनेच्या अंमलबजावणीची मागणी करीत आहेत. शहरामध्ये माणसी 135 ते 140 लिटर प्रतीमाणसी असा मापदंड लावला जातो परंतु ग्रामीण भागामध्ये 40 ते 45 लिटर प्रतीमाणसी तो लावला जातो व प्रत्यक्षात 40 लिटर पाणी देखील ग्रामीण भागात देण्यास शासन सक्षम नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रलंबित योजनांना गती देण्याची मागणी त्यांनी केली.

पाणी पुरवठा मंत्र्यांचे आश्‍वासन
दौंड तालुक्यातील यवत, केडगाव, कडेठाण,भांडगाव, स्वामी चिंचोली, पडवी, वरवंड, कुरकुंभ, बिरोबावाडी, कासुर्डी व लिंगाळी या 11 गावांचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना टप्पा 2 मध्ये करण्याची मागणी त्यांनी केली. यावर बोलताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दौंड तालुक्यातील सदर 11 गावे मुख्यमंत्री पेयजल योजना टप्पा 2 मध्ये समाविष्ट करण्याचे आश्‍वासन दिले.