दौंड-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

0

दौंड । गेल्या एक तपापासून मागणी असलेल्या दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच या कामाचा शुभारंभ होणार असून हे काम पुढील पाच वर्षात म्हणेज 2021-22 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 2 हजार 81 कोटी आणि पूर्णत्वाचा खर्च 2 हजार 330 कोटी तसेच वार्षिक 5 टक्के वाढीसह असेल. या दुहेरीकरणामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक परिसरातील प्रवासी आणि मालवाहतुकीला फायदा होणार आहे़ त्याचबरोबर पुण्याहून दौंड-मनमाडमार्गे उत्तर भारतात जाणार्‍या तसेच शिर्डी आणि शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्रांना जाणार्‍या यात्रेकरुंसाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे.

वेळ वाचणार
दौंड-मनमाड एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. पुण्याहून उत्तर भारतात जाणार्‍या गाड्यांचा या मधल्या टप्प्यात खूप वेळ जातो़ त्यात काही कारणाने या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उशीर झाला तर सर्वच वेळापत्रक बिघडून जाते. त्याचा परिणाम पॅसेंजर व अन्य गाड्यांना होत असतो. दुहेरीकरण पूर्ण झाल्यावर अनेक गाड्यांचा वेळ कमी होऊ शकणार आहे.

अनेकांना मिळणार रोजगार
पुणे-नगर दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस चालविणे शक्य होऊ शकणार आहे. या दुहेरीकरणाच्या कामामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. 2014-15 मध्ये दौंड-मनमाड विभागातील मार्ग क्षमतेचा वापर देखभालीसह 156 टक्के होता. मुंबई-चेन्नई मार्गावर भिगवण-मोहोळ, होटगी-गुलबर्गा दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यावर दौंड-मनमाड विभागावरील वाहतुकीत प्रचंड वाढ होईल. त्यावेळी हा एकेरी मार्ग वाढीव वाहतुकीला सामोरे जाण्याच्या स्थितीत नसेल़ त्यामुळे दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्याला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

काम लवकर पूर्ण करा
गेल्या 12 वर्षांपासून दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी करण्यात येत होती. खर तर विद्युतीकरणाच्या कामाबरोबरच दुहेरीकरणाचे काम करणे आवश्यक होते. या दुहेरीकरणानंतर पुणे-नगर दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करता येऊ शकेल. रेल्वेने आता वेळ न लावता लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे.
– विकास देशपांडे, सदस्य, दौंड सल्लागार समिती