दौर्‍यावरील खातेप्रमुखांनी सर्व बाबींची पाहणी करावी

0

पुणे । जिल्हा परिषदेच्या विविध खात्यातील खाते प्रमुखांपैकी साधारणपणे रोज एखाद्या तरी खाते प्रमुखाचा जिल्हा दौरा असतो. यामुळे जिल्हा दौरा करताना खाते प्रमुखाने आपल्याच विभागापुरती पाहणी न करता सर्व मुलभूत बाबींची पाहणी करावी. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये महिला बालकल्याण, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन, कृषी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य व बांधकाम, अर्थ विभाग यांसह एकूण 17 विभागप्रमुख कार्यरत आहेत. दररोज एखाद्या तरी अधिकार्‍याचा जिल्ह्यात दौरा आयोजित केला जातो. त्यावेळी अधिकार्‍याने स्वत:चे नियोजित काम सांभाळून जिल्हा परिषदेशी संबंधित विभागांमध्ये जाऊन तेथे नागरिकांना सोयीसुविधा दिल्या जातात का, त्यांची गैरसोय होते का किंवा त्यांना काय अडचणी भेडसावतात याबाबत पाहणी करावी. त्यामुळे प्रत्येकजण सजग राहील आणि नागरिकांच्या हितासाठी बांधील राहील, असा संदेश जाईल़ विभागप्रमुखांमध्ये वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहत. अधिकारी दौर्‍यावर गेल्यानंतर त्यांना जाणवलेल्या गोष्टींची संबंधित विभागप्रमुखांना माहिती द्यावी. आवश्यकता असल्यास उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही याबाबत माहिती द्यावी, असा आदेश मांढरे यांनी काढला आहे.

एखादा विभागप्रमुख तालुक्यातील एखाद्या गावात गेल्यास तेथील इतर विभागांना भेट द्यावी व तेथे कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतात का, नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर दिल्या जातात का, याबाबतची पाहणी करावी. यामुळे अधिकारी सतत भेट देतात. यामुळे चांगले काम करावे, कामात कसूर ठेवू नये, असा संदेश कर्मचार्‍यांमध्ये जाईल व जिल्हा परिषदेच्या कामांची
गती वाढेल.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी