नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध मालिकेत करुण नायर, के. एल. राहुल आणि जयंत यादव यांच्या यशाचे श्रेय माजी कर्णधार राहुल द्रविडने प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीला दिले आहे. या दोघांनी युवा खेळाडूंसाठी अतिशय चांगले वातावरण तयार केले आणि त्याचा फायदा टीम इंडियाला झाल्याचे द्रविड मानतो. भारत ‘अ’ आणि 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक असलेल्या द्रविडने खेळाडूंना घडवण्याची प्रक्रिया याच संघातून सुरू झाल्याचे म्हटले आहे. स्थानिक स्पर्धा आणि ‘अ’ संघातून हे खेळाडू पुढे जाऊन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रमी कामगिरी केली हे पाहणे सुखद आहे.
अत्यंत जबाबदारीने खेळत आहे युवापिढी
राष्ट्रीय संघात आता युवा खेळाडूंसाठी अतिशय चांगले वातावरण तयार केले गेले आहे. त्याचे श्रेय अर्थात कुंबळे आणि विराटला द्यावे लागेल, असे द्रविडने ‘बीसीसीआय’च्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. चेन्नई कसोटीत विक्रमी त्रिशतक ठोकणार्या नायरला द्रविड ‘अ’ संघ, दिल्ली डेअरडेव्हिल्स तसेच राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पाहतो आहे. पहिल्या शतकाचे त्रिशतकात रुपांतर करून नायरने आपण धावांचा रतीब घालू शकतो हे सिद्ध केले. भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर अत्यंत जबाबदारीने ही युवा पिढी खेळताना पाहून खरोखरच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे. ‘अ’ संघाचा प्रशिक्षक म्हणून जास्तीत जास्त चांगले खेळाडू राष्ट्रीय संघाला देणे याला आपले प्राधान्य असल्याचे द्रविडने म्हटले आहे. भवितव्यात राष्ट्रीय संघाला नेमके कसे खेळाडू अपेक्षित आहेत, यासाठी आम्ही नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो. सर्व प्रकारच्या खेळाडूंना संधी देण्यास मी उत्सुक आहे, कारण त्यामुळे भारतीय संघाला आणखी दर्जेदार खेळाडू मिळतील, असेही द्रविडने म्हटले आहे. काही खेळाडू ज्युनिअर पातळीवर अपयशी ठरले तरी राष्ट्रीय पातळीवर यश मिळू शकते. अशा खेळाडूंच्या आम्ही पाठीशी असल्याचे द्रविडने म्हटले आहे.