पुणे: भाजपची महाजानादेश यात्रा आज पुण्यात आहे. पुण्यात यात्रेला सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. भाजपात अनेक नेते प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जे लोक त्यांच्या पक्षातून भाजपात आली त्यांच्यावर आता टीका होत आहे. जोपर्यंत पक्षात होते तोपर्यंत ती व्यक्ती गोड वाटत होती आता मात्र त्यांना दोष दिले जात आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जी द्राक्षं मिळत नाहीत ती आंबट असतात अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे असा टोला लगावला.
दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये यापुढे मेगाभरती होणार नाही, मात्र भरती सुरूच राहणार आहे, असे सूचक वक्तव्य केले .
बारामतीत ३७० कलम लागू आहे का?
बारामतीत दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी सभाच घ्यायच्या नाही का? बारामतीत ३७० कलम लागले आहे का? तुम्ही आमच्या शहरात या, सभा घ्या. आम्ही सहकार्य करतो, असे विधान फडणवीस यांनी केले. बारामतीत मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न झाला, त्याबाबत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘फक्त सात कार्यकर्ते येऊन सभा उधळण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस येताच ते पळून गेले. बारामतीत लाठीचार्ज झाला नाही’ असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.