द्रुतगतीमार्ग बाधित शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा

0

सर्व समस्या, मागण्या लवकर सोडविण्याची मागणी : बारा गावातील शेतकर्‍यांची बैठक

शिरगाव । द्रुतगती महामार्गालगत व महामार्गात संपादीत केलेल्या जमिनीबाबत असलेल्या समस्या व मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात अन्यथा महिनाभरानंतर मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा उर्से येथे झालेल्या पद्मावती मंदिरातील बैठकीत देण्यात आला.

द्रुतगती महामार्गालगत व महामार्गात संपादीत केलेल्या जमिनींबाबत असलेल्या समस्यांबाबतच्या बैठकिसाठी बारा गावातील बाधीत शेतकरी उपस्थीत होते. या बैठकीत सर्व्हीस रस्ता, शेतकर्‍यांना व्यवसाय व नोकरीत प्राधान्य, बाधीत शेतकर्‍यांना टोल फ्री व द्रुतगती महामार्गावरील उत्पन्नात वाटा मिळावा याबाबत चर्चा करण्यात आली. द्रुतगती महामार्गावर संपादीत केलेल्या जमिनींबाबत तीनवेळा निवेेदन देऊनही शासनाने दखल न घेतल्यामुळे महिन्याभरानंतर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी बोलताना इशारा दिला.

सर्व अधिकार्‍यांची एकत्रीत बैठक
द्रुतगती महामार्गाला जमिनी दिल्या. आज त्यातील उत्पन्न मोठ्या लोकांना मिळत आहे. द्रुतगती महामार्गावरील उत्पन्न मूळ मालकांनाच मिळाले पाहिजे, अशी मागणी तळेगावचे माजी नगराध्यक्ष कृष्णराव कारके यांनी यावेळी केली. लवकरच जिल्हाधिकारी, तहसीलदार, रस्ते विकास महामंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची एकत्रितरित्या बैठक घेऊन हा विषय समोरासमोरच मिटविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे शेतकरी किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार यांनी सांगितले.

जमिनी परत द्या
सोमाटणे येथील बाधीत शेतकरी निलेश मुर्‍हे म्हणाले, लोढासारख्या मोठ्या बिल्डरला द्रुतगती महामार्गावर काही गोष्टींसाठी परवानगी व ट्रामा सेंटरला रस्ता दिला जातो. मग आम्ही जमिनी देऊन आम्हाला का नाही. संपादीत जमिनीचा मोबदला अद्याप घेतला नसून जमिनीवर रस्ते विकास महामंडळाचा शिक्का आहे. त्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी कृष्णराव कारके, नाना धामणकर, शंकर बोडके, प्रवीण गोपाळे, अनिल कारके, शंकरराव शेलार, उद्ध्वराव शेलार, चंद्रकांत ओझरकर, पांडुरंग ओझरकर, कचरु पारखी, भिवाजी धामणकर, बाबुराव ओझरकर, अंकुश घारे, पांडुरंग घारे, खंडु घारे यांनी मागणी केली.