लोणावळा : सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने पर्यटनास निघालेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे सलग दुसर्या दिवशीही पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर दोन्ही बाजुने वाहतुकीचा खोळंबा झाला. तसेच वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. अमृतांजन पूल ते खोपोली एक्झिटदरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाला. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा बाह्यवळण ते बोगद्यादरम्यान सुरक्षेसाठी डोंगराकडील एक लेन बंद असून, उर्वरित दोन लेनवर वाहतुकीचा ताण येत आहो. या मार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस तैनात केले आहेत.
गोवा मार्गावरही अडथळा
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंद गतीने सुरु असतानाच मुंबई-गोवा महामार्गावर अॅसीडचा टँकर उलटल्याने वाहतूक थांबवली होती. त्यामुळे पर्यटनास निघालेल्या नागरिकांचे हाल झाले.
पर्यटकांचा ओघ वाढला
सलग सुट्ट्यामुळे लोणावळ्यासह महबळेश्वर, कोल्हापूर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंदावली होती. पुणे, मुंबई, ठाण्यासह इतर शहरातील अनेक नागरिक प्रवासास बाहेर पडल्याने या मार्गांवर वाहनांची संख्या वाढली होती.
मुंबईकडील वाहने तासा-तासाने
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारीही वाहतूक कोंडी ङ्गजैसे थेफ पहायला मिळाली. वाहतूककोंडीमुळे वाहने दीड-दोन तास खोळंबली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिटजवळ रोखून धरण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला. तसेच एक तासाच्या अंतराने ही रोखलेली वाहने पुन्हा सोडण्यात येत होती. यादरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांवरुन सोडल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.