जय गणेश फाउंडेशन समन्वय समितीच्या बैठकीत माहिती
भुसावळ- शहरात ‘जय गणेश फाउंडेशन’तर्फे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात द्वारकाई व्याख्यानमाला होणार आहे. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून ‘माय, माती, माणूस’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे, अशी माहिती समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आली. सुरभी नगरातील फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी ही बैठक झाली. व्याख्यानमाला समन्वयक अरुण मांडळकर, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
‘फिरत्या व्याख्यानमालेचे’ आयोजन
विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन, मननाची गोडी लागावी या उद्देशाने व्याख्यानमालेचे स्वरुप फिरते ठेवण्यात आले असल्याने तिला ‘फिरती व्याख्यानमाला’ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत आठ हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांनी दिली. मराठी भाषेचे महत्व विद्यार्थी व पालकांना कळावे म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. यंदाही कोटेचा महिला महाविद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, सातपुडा शिक्षण संस्था संचलित भुसावळ हायस्कूल अशा तीन शाळांमध्ये तीन पुष्प गुंफले जातील, असे समन्वयक मांडळकर यांनी सांगितले.