द्वारकाई व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प विशाल उशिरे, अनंत राऊत गुंफणार

0

‘जय गणेश फाउंडेशन’च्या उपक्रमाचे चौथे वर्ष : समारोप शेगावच्या माया दामोदरांच्या व्याख्यानाने

भुसावळ- शहराची ओळख सांस्कृतिक पंढरी व्हावी म्हणून ‘जय गणेश फाउंडेशन’ने स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडेंच्या आठवणी जपण्यासाठी तीन दिवसीय द्वारकाई फिरती व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. 26 जुलै रोजी प्रथम पुष्प रायगड जिल्ह्यातील खालापूरचे कवी विशाल उशिरे व अकोल्याचे कवी अनंत राऊत हे संयुक्त गुंफतील. त्यानंतर 28 रोजी द्वितीय, 30 रोजी तृतीय पुष्प गुंफले जाईल. प्रथम पुष्पाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ हायस्कूलचे चेअरमन जे.एच.चौधरी असतील. प्रमुख पाहुणे माजी चेअरमन ए.एन.शुक्ला, कठोरा येथील गोळवलकर प्रबोधिनीचे अध्यक्ष सोपान नारायण जाधव, भुसावळ हायस्कूलचे मुख्याध्यापक हितेंद्र धांडे असतील. द्वितीय पुष्पाच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र मांडे असतील. प्रमुख पाहुणे अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनील नेवे, सुलभा चापोरकर, अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राची देसाई असतील. तृतीय पुष्पाच्या अध्यक्षस्थानी प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.मंगला साबद्रा या भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणून डीआयईसीपीडी, जळगावचे प्राचार्य प्रा.डॉ.गजानन पाटील असतील. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानप्रकाश योजनेचे अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे यांची उपस्थिती लाभणार आहे. द्वारकाई व्याख्यानमालेचे यंदा चौथे वर्ष आहे. खान्देशासह महाराष्ट्रभरातील 10 वक्त्यांची व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे व जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडळकर यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी रसिक, पालकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रथम पुष्प भुसावळ हायस्कूलमध्ये
शहरातील भुसावळ हायस्कूलमध्ये ‘बालगोपाळा हा कवितेचा मेळा’ या विषयावर विशाल उशिरे (खालापूर, जिल्हा रायगड), अनंत राऊत (अकोला) 26 रोजी सकाळी 10 वाजता पहिले पुष्प गुंफतील.

द्वितीय पुष्प : कोटेचा महिला महाविद्यालयात
शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात 28 रोजी सकाळी 10 वाजता द्वितीय पुष्प ‘आनंदयात्री साहित्य आणि कवितेची वारी’ या विषयावर प्रमोद सखाराम अंबडकर (नाशिक) हे द्वितीय पुष्प गुंफतील.

तृतीय पुष्प : अहिल्यादेवी कन्या विद्यालयात
शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात 30 रोजी दुपारी 12 वाजता ‘संस्कार, स्वातंत्र्य अन् जगण्याची दिशा’ या विषयावर माया दामोदर (शेगाव, जिल्हा बुलढाणा) या तृतीय पुष्प गुंफतील.