नवी दिल्ली- ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ मधील ८० टक्के दावे खोटे असल्याचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांनी सांगितले आहे. या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक संजय बारू यांच्यावरही नारायणन यांनी टीका केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले बारू यांनी पैसे कमावण्यासाठी हे पुस्तक लिहिले होते, असा आरोप मनमोहन सिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या नारायणन यांनी केला.
भारत चेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुस्तकातील ८० टक्के दावे खोटे आहेत. सरकारमध्ये त्यांचे तेवढे मोठे पद नव्हते तसेच त्यांना महत्वही नव्हते. माध्यम सल्लागार म्हणून त्यांचे काम ही चांगले नव्हते. यूपीएचे सरकार पुन्हा येईल, असे त्यांना वाटले नाही. त्यामुळेच ते २००८ मध्ये गेले.
भारत-अमेरिका अण्वस्त्र करारात नारायणन यांची महत्वाची भूमिका होती. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरवर चित्रपट आला आहे. तर आता डिझास्टर्स प्राइम मिनिस्टरवरही चित्रपट बनला पाहिजे. तो चित्रपट भविष्यात तयार होईल, असे म्हटले आहे.