पोलीसच असुरक्षित नागरिकांचे काय ? ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार
जळगाव- नागरी वस्त्यांमधून नागरिकांच्या बंद घरातून चोरी होते, इतपर्यंत ठिक आहे. मात्र जेव्हा पोलीस लाईनमधील रहिवासी असलेल्या पोलिस कर्मचार्याच्या घरात भरदिवसा चोरी होते तेव्हा मात्र खरच पोलिसाचा धाक संपला की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. अशाच एका घटनेचा नुकताच प्रत्यय आला आहे. दक्षता पोलीस लाईनमधील बिल्डींगमधील रहिवासी पोलीस कर्मचार्याच्या उघड्या घरातून सकाळी 6.30 वाजता 10 हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची घटना 16 रोजी समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसच सुरक्षित नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असाही नाराजीचा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहरात पोलीस लाईनमधील दक्षता नगरात, 272, बिल्डींग नं 8 खोली नं 4 येथे विनोद डोळे हे पत्नीसह राहतात. डोळे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. 16 रोजी डोळे हे सकाळी नेहमीप्रमाणे 6.30 वाजता ड्युटीवर गेले. जातांना त्यांनी दरवाजा आडवा केला होता. पती गेल्यानंतर पत्नी राजश्री डोळे यांनी मोबाईलमध्ये 7.30 वाजेच्या अलार्मची बेल लावली. मोबाईल पलंगावरच बाजूला ठेवून त्या झोपून गेल्या. 8.30 वाजता राजश्री डोळे यांना जाग आल्यावर त्यांनी मोबाईल शोधला मात्र मोबाईल जागेवर नव्हता. सर्वत्र घरात शोधाशोध केली असता, मिळून आला नाही. दोन तीन दिवस त्यांनी पोलीस लाईनमध्येही मोबाईल बाबत विचारपूस केली मात्र मिळून आला नाही. अखेर मोबाईल चोरीची खात्री झाल्यावर 21 जून रोजी डोळे दाम्पत्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. राजश्री विनोद डोळे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.