धक्कादायक: अधिवेशनासाठी कोरोना टेस्ट, ११ कर्मचारी पॉझिटिव्ह

0

मुंबई: उद्या ७ सप्टेंबरपासून राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ७ आणि ८ सप्टेंबर दोनच दिवसांचे हे अधिवेशन होत आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय, विधानभवनातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि आमदारांना कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. दरम्यान मंत्रालयात करण्यात आलेल्या १५०० टेस्टपैकी ११ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. उद्यापासून अधिवेशन सुरु होत असल्याने चिंता देखील वाढली आहे.

कोरोनामुळे अधिवेशन घेणे अवघड होते, परंतु धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने अधिवेशन घेणे आवश्यक असल्याने दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांसह आमदारांना टेस्ट करावी लागत आहे. सभागृहात मोजकेच आमदार उपस्थित राहणार असून उर्वरित आमदार गॅलरीत बसावे लागणार आहे. एका बाकावर एक आमदाराला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.