धक्कादायक: केंद्र सरकारच्या या कंपनीतून २० हजार कर्मचाऱ्यांची कपात

0

नवी दिल्ली: करोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. सरकारी कार्यालयातील नोकऱ्यांवर सुद्धा कोरोनामुळे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील टेलिकॉम क्षेत्रातील मोठी कंपनी मानल्या जाणाऱ्या बीएसएनएलने मोठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी कंत्राटी आहेत. याआधी बीएसएनएलने ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. धक्कादायक म्हणजे हा निर्णय अशा वेळी घेतला गेला आहे जेव्हा या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही.

BSNLच्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष व्ही के पुरवार यांना पाठवलेल्या पत्रात कंपनीच्या या परिस्थितीला स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जेव्हा ही योजना अमलात आली तेव्हा कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली. आता कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचारी नसल्याची स्थिती आहे. यामुळे नेटवर्क फॉल्ट वाढला आहे.

कर्मचारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या १४ महिन्यापासून पगार दिला नाही. यामुळे १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. VRS योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना नियमीत वेळेत पगार दिला जात नाही.

प्रत्यक्षात VRS योजना अंमलात आल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम करणे अधिक गरजेचे झाले आहे. आतापर्यंत VRS योजनेतून ७९ हजार कर्मचारी कंपनीतून बाहेर पडले आहेत. जेथे कंपनीचे नियमीत कर्मचारी काम करण्यास जात होते तेथे कंत्राटी कर्मचारी जात होते. आता त्यांना देखील कामावरून कमी केले आहे. त्यामुळे बीएसएनएलचे काम कसे चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.