धक्कादायक : ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमधील कर्मचारी वेतनाविना
शासन बेदखल : कोरोनाच्या कठीण काळातही बजावताय सेवा
भुसावळ : शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमधील कर्मचार्यांचे वेतन तब्बल गेल्या सात-आठ महिन्यांपासून थकीत असून कर्मचार्यांना कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागता आहे. कर्मचार्यांना वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी प्रशासलनाला दिला आहे.
अधिकार्यांसह कर्मचार्यांचे वेतन थकल्याने आश्चर्य
भुसावळातील बहुतांश कोरोना रूग्णांचे उपचार हे ग्रामीण रूग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये होत आहेत. अलीकडच्या काळात रूग्णांची संख्या वाढल्याने येथील कर्मचार्यांवर आधीच तणाव आलेला आहे. यातच येथील कर्मचार्यांच्या वेतन थकीत आहे. यात वर्ग-1 अधिकार्यांचे वेतन सात महिन्यांपासून; वर्ग-2 कर्मचार्यांचे नऊ महिन्यांपासून तर तृतीय वर्गातील कर्मचार्यांचे आठ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परीणामी एका बाजूने कोरोनाच्या सावटाखालील सेवा तर दुसरीकडे आर्थिक विवंचना यात हे कर्मचारी अडकलेले आहेत. या अनुषंगाने भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी आता या कर्मचार्यांचे थकीत वेतन मिळण्याची मागणी केली आहे. डॉ.पाटील यांनी आज ट्विट करून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आदींसह अन्य मान्यवरांना टॅग करून भुसावळच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील अधिकारी व कर्मचार्यांची समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. 15 दिवसांमध्ये वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ.नि.तु.पाटील यांनी दिला आहे.