वाहन जप्त टाळण्यासाठी मागितली लाच ः जळगावच्या विभागाची कारवाई
जळगाव ः फायनान्स कंपनीद्वारे हप्ते थकल्याने वाहन जप्तीची प्रक्रिया थांबवण्यासाठी चार हजारांची लाच मागणार्या महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचचे अधीक्षकघनश्याम आसाराम सोनवणे (50, रा.शिव कॉलनी, प्लॉट नं 19, मारुती पार्क, जळगाव) यांना शुक्रवारी सकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
दाद मागणार्या ग्राहकालाच मागितली लाच
जळगाव शहरातील 30 वर्षीय तक्रारदाराने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून वाहन घेतले मात्र काही कारणास्तवर कर्ज हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र तक्रारदार यांनी त्यांचे वाहन जप्त न होण्यासाठी स्थगिती मिळावी याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगावकडे अर्ज केला होता. स्टे ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष घनशाम सोनवणे यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
चहाच्या दुकानानावर सापळा रचून ताब्यात
शुक्रवारी ग्राहक मंच कार्यालयाजवळील एका चहाच्या दुकानावर सोनवणे यांना बोलावण्यात आले. याठिकाणी तक्रारदाराकडून चार हजारांची लाच घेतांना सोनवणे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश लोधी, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.