धक्कादायक ! नगरसेवकाच्या घरी झाली चोरी ; 65 हजारांचा मुद्देमाल लांबविला

चोपडा । येथील नगरसेवक अशोक बाविस्कर यांच्या विद्याविहार कॉलनीतील घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 25 हजार किंमतीचा टीव्ही आणि 40 हजारांची रोकड असा 65 हजारांचा मुद्देमाल लांबविला आहे. दरम्यान, याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेवक बाविस्कर 22 रोजी आपल्या कुटुंबासह शहरातील बारी वाड्यातील जुन्या घरी रेशन वाटप करण्यासाठी गेले होते. 29 रोजी सकाळी त्यांच्या विद्याविहार कॉलनीतील दुमजली घरातील भाडेकरू सतीश सोनवणे यांनी त्यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप व कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. माहिती मिळाल्यावर बाविस्कर यांनी त्वरित घर गाठले. त्यावेळी 65 हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.