जळगाव – शतपावली करण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेस दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वावडदा येथे हि घटना घडली आहे. या संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत शतपावली करत होत्या. इतक्यात दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
दरम्यान, संबंधीत दुचाकीस्वार हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. आज सकाळी ज्योती गोपाळ हीचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. संबंधीत दोषी मोटाल सायकल स्वारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला असून यामुळे तणावाचे वातावरण निर्मित झाले आहे.