धक्कादायक : प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडीलांनीच केली मुलाची हत्या

चाळीसगाव: मुलाने कुटुंबाच्या मनाविरुद्ध प्रेम विवाह केला म्हणून चक्क आई-वडीलांनीच आपल्या मुलाचा गळा दाबून निघृण खुन केल्याची घटना शहरातील कैलास नगर भागात घडली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित दाम्पत्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने शहर पोलिस ठाण्यात दि.९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मयत निलेश प्रताप कुमावत (रा. कैलास नगर, भुषण मंगल कार्यालय ता. चाळीसगाव) यांनी प्रेमसंबंधातून विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय-३५ रा. सदिच्छा नगर, जि. धुळे) हिच्याशी विवाह केला होता. त्याचा विवाहास घरच्यांचा विरोध होता. मात्र आई अलका प्रताप कुमावत (वय-५६) व वडील प्रताप सहादु कुमावत (वय- ६४) त्यांच्या प्रेम विवाहास स्पष्ट विरोध होता. मात्र दि.१३ मार्च २०२० रोजी (वेळ निश्चित नाही) निलेश कुमावत याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन न करता परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या प्रकरणी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय-३५ रा. सदिच्छा नगर, जि. धुळे) यांनी चाळीसगाव न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने याची दखल घेत कलम १५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दि. ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री भादवि कलम- ३०२, २०१, ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.