दुबई पोलिसांचा न्यायवैद्यकीय अहवाल
दुबई : ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे तर हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचा न्यायवैद्यकीय अहवाल दुबई पोलिसांनी जारी केला आहे. पोलिसांच्यावतीने श्रीदेवीचे शवपरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर हा अहवाल हाती आला होता. कपूर कुटुंबीय आणि भारतीय दुतावासालादेखील हा अहवाल सोपविण्यात आला आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी त्यांच्या शरीरात अल्कोहलचे प्रमाण आढळले असल्याचे नमूद केले असले तरी, या अहवालात मात्र तसा काहीही उल्लेख नव्हता. केवळ ’अपघाताने बुडून मृत्यू‘ असाच या अहवालात उल्लेख आहे. पोलिसांनी हे प्रकरण आता स्थानिक न्यायसंस्थेकडे सोपविले असून, शासकीय व न्यायिक प्रक्रिया दिवसभर वेगात सुरु होती. दरम्यान, मंगळवारपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिक मुंबईत आणले जाईल, अशी माहिती बोनी कपूर यांनी मुंबईतील प्रसारमाध्यमांना दिली होती. दुबई पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेप्रकरणी त्यांना श्रीदेवी यांचे पती बोनी कपूरसह त्यांच्या कुटुंबीयांची व हॉटेल कर्मचार्यांचीही चौकशी करावी लागणार आहे. मृतदेह भारतात आणण्यासाठी वेळ लागत असून, दुबई पोलिसांनी परवानगी दिली असली तरी, आता तेथील सरकारी वकिलांनी परवानगी देण्याची गरज आहे. त्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती तेथील राजदूत नवदीप सुरी यांनी दिली आहे.
अतिमद्यप्राशनाने बाथरूममध्ये कोसळल्या?
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचे शवपरीक्षण करण्यात आले असून, त्यात त्यांचा मृत्यू हा बाथटबमध्ये बुडून झाला असल्याचे ठळकपणे नमूद आहे. तसेच, त्यांच्या शरीरात अल्कोहलचे प्रमाणही आढळले आहे. दुबई पोलिसांनी शवपरीक्षणाचा न्यायवैद्यकीय अहवाल जाहीर केला असून, त्यात मात्र अल्कोहलचा उल्लेख नाही. गल्फ न्यूज या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांनी अतिप्रमाणात मद्यप्राशन केले होते. त्या बाथरुममध्ये गेल्यानंतर त्यांचा तोल गेला व त्या बाथटबमध्ये पडल्या. त्यानंतर त्यांचा टबमध्येच बुडून मृत्यू झाला. श्रीदेवी यांच्या शवपरीक्षणाचा अहवाल भारतीय दुतावासासह कपूर कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला असून, त्यांचे पार्थिव तातडीने ताब्यात मिळण्यासाठी भारतीय दुतावासाकडून सर्वतोपरी प्रयत्न चालविले होते. तथापि, दुबई पोलिसांनी हे प्रकरण आता न्यायसंस्थेकडे सोपविले आहे. तेथील सरकारी वकिलांनी परवानगी दिली तरच हे पार्थिव कपूर कुटुंबीयांच्या ताब्यात मिळू शकते. बोनी कपूर यांच्यासह त्यांची कन्या खुशी ही मात्र भारतात परतल्याचेही सांगण्यात आले. याप्रकरणात सरकारी वकिलांकडून आणखी तपासाची प्रक्रिया पार पाडली जाणार असून, त्यात कपूर कुटुंबीयांसह हॉटेल कर्मचारीवर्गाचीही सरकारकडून चौकशी केली जाणार आहे. तथापि, मंगळवारपर्यंत पार्थिव दुबईत पोहोचेल, असे बोनी कपूर यांनी मुंबईतील पत्रकारांना सांगितले होते.
श्रीदेवी हॉटेलमध्ये एकट्याच होत्या!
शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास श्रीदेवी यांनी रूम सर्व्हिसला फोन करून पाणी मागितले. हॉटेल स्टाफ 15 मिनिटांनी पाणी घेऊन श्रीदेवी यांच्या रूममध्ये पोहचला. अनेकदा रूमची बेल वाजवूनही श्रीदेवी यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आत काहीतरी झाले असावे, असा विचार करून हॉटेल स्टाफने दरवाजा तोडला. तेव्हा श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या स्टाफला दिसल्या. रात्री 11 वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली. हॉटेल कर्मचार्यांनी श्रीदेवी यांना पाहिले तेव्हा त्यांच्या ह्रदयाचे ठोके सुरू होते. श्रीदेवी त्यावेळी हॉटेलमध्ये एकट्याच होत्या, असा दावा केला जातो आहे. हॉटेलमधील सूत्रांनी दुबईतील एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे.
श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद
1. शरीरात अल्कोहल सापडले का, त्याचे प्रमाण किती याचा शवपरीक्षण अहवालात उल्लेख नाही.
2. मृत्यूची नेमकी वेळ नमूद नाही.
3. श्रीदेवी नशेत असताना, बाथटबमध्ये पाणी कुणी भरले? याचा तपास करावा लागणार.
4. त्या जर नशेत होत्या तर त्या बाथटबमध्येच कशा पडल्या, त्यांना दुखापत कशी झाली नाही?
5. जर त्या पाण्यात पडल्या तर मग पाणी कसे काय उसळले नाही?