पुणे: मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी सिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याची चाचपणी करत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे या हालचाली सुरू असतानाच, शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी येथे केली.
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी कोणाचा पाठिंबा घ्यायचा, यावरून शिवसेनेत खलबते सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राणे यांनी शिवसेनेला डिवचले. शिवसेनेने राज्य सरकाराचा पाठिंबा काढण्याची तयारी दाखविल्यास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक अविश्वासदर्शक ठराव मांडू शकतात. मात्र, शिवसेनेशिवाय हा ठराव मांडता येणे शक्य नाही. अविश्वासदर्शक ठरावासाठी पुरेसे संख्याबळ लागते. त्यामुळे शिवसेना आमच्याबरोबर आली तरच हे शक्य आहे. तथापि, शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द?
भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतील दरी आणखी वाढवून भाजपची कोंडी करण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे. मुंबईत महापौरपदासाठी भाजपला मदत करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर, शिवसेनेला मात्र अप्रत्यक्षरित्या मदत पुरवण्यात येऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असून, त्यामुळे आता पुढे कोणती समीकरणे उदयास येतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, उभय पक्षांतील वाद वाढू नये म्हणून राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी होणारी बैठकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याचे कळते.