साल नेमके कोणते असावे आता आठवत नाही साधारणतः 88च्या आसपास असावे. अकोट या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही काही मित्र जागो हा हिंदी सिनेमा पाहायला गेलो होतो, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आणि शेवटी हातात शस्त्र घेणारा नायक पाहून खूप प्रभावित झालो होतो. त्याआधी खूप सिनेमे बघितले होते, नायक बर्यापैकी माहीत होते, पण हा नायक पहिल्यांदाच बघत होतो. बलदंड शरीर, डोक्यावर केशसांभार, चेहर्यावर दाढी, अतिशय बोलके डोळे, हातात कडे आणि अन्याय बघितला की आवळणारी हाताची मूठ मला अतिशय भावली होती. सिनेमाचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्याची फारकाही चर्चा झाली नव्हती, पुढे चारपाच दिवसांनी शिवशक्ती या दैनिकात या सिनेमाचे परीक्षण वाचले तेव्हा कळले की या सिनेमाचा नायक भाऊ जांबुवंतराव धोटे होते म्हणून. सुरेंद्र भुयार, नानाभाऊ एम्बडवार यांच्याही भूमिका त्यात होत्या हे आजही आठवते. महेंद्र कपूरच्या पहाडी आवाजात अन्यायाविरुद्ध गीत गाताना पडद्यावर दिसलेला जांबुवंतराव धोटे यांच्यातला नायक पुढे कायमच ती भूमिका जगला.
आज पहाटे या संघर्षशील नायकाने जेव्हा जगाचा निरोप घेतला तेव्हा भाऊ जांबुवंतराव धोटे हे काय रसायन होते याचा उलगडा व्हायला लागला. आपल्या पुढे एखाद्या व्यक्तीचे जीवन एवढे संघर्षाने भरलेले असू शकते, यावर आताच्या काळात विश्वास बसत नाही. कारण तो काटेरी मार्ग निवडणारी माणसं आपल्यात येणेच गेल्या 50 वर्षांत बंद झाल्याचे दिसते. विदर्भाच्या आंदोलनाचा जेव्हा जेव्हा विषय निघत होता तेव्हा बुजुर्ग मंडळीकडून भाऊंचे किस्से ऐकूनच माझी पिढी मोठी झाली. नागपुरातील गंगा-जमुना हे नाव माहीत नाही, असा एकही तरुण विदर्भात सापडणार नाही, ही वेश्यांची वस्ती असल्यामुळे तिच्याबाबत प्रचंड कुतूहल माझ्या मनात होते आणि एककाळ असा होता की, त्या वस्तीत प्रत्येक घरात जांबुवंतराव धोटे यांचा फोटो असायचा. महापालिकेने जेव्हा ही अनधिकृत वस्ती काढायचे ठरवले तेव्हा धोटे या हजारो वेश्यांच्या पाठीशी त्यांचा भाऊ म्हणून धावून गेले. वस्तीसाठी त्यांनी लढा दिला. लाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेले.
पुढे दीर्घकाळ गंगा-जमुना वस्तीमधील रक्षाबंधन गाजत आणि फिरत राहिले ते जांबुवंतराव धोटे यांच्याभोवती. माणसाच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांनी ज्यांना कायम टाळले त्यांच्यासाठी धावून जाणारा हा नायक तेव्हापासूनच हजारो वेश्यांचा भाऊ झाला, असे राजकीय नेत्यांच्या जीवनात खचितच घडते. जे कुणीही करण्याच्या भानगडीत पडत नाही अशा सगळ्या विषयांना हात घालत पुढे जाणे हा त्यांचा वेगळा स्वभाव पैलू लाखो लोकांनी या दीर्घ प्रवासात अनुभवला आहे. धोटे राजकारणी कधीच नव्हते, लोकांसाठी सतत संघर्ष करणे आणि जिथे अन्याय, अत्याचार, दादागिरी दिसली तिथे जीवाची परवा न करता धावून जाणे, हा पहिलवानी पिंड त्यांनी कायम जपला. एकेकाळात यवतमाळ शहरात बब्बी पहिलवान नामक गुंडाची भयंकर दहशत होती. त्याच्याशी दोन हात करून त्याला चारीमुंड्या चीत करण्याचे कामही याच माणसाला करावे लागले. पुढे हाच पहिलवान भाऊंचा चाहता झाल्याचे सांगितले जाते.
रांगडा स्वभाव, पिवर गावरान व्यक्तिमत्त्व, साधी राहणी आणि करारी डोळ्यातून समोरच्याला थेट भिडणारे भाऊ जांबुवंतराव 71 साली लोकसभेवर निवडून गेल्यावर पुन्हा खासदार झाले, पण दिल्लीत त्यांचे मन रमले नाही, त्यानंतर त्यांनी पाचवेळा यवतमाळचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. राजदंड आणि पेपरवेट हाताळणे कदाचित त्यांनीच पहिल्यांदा आमदारांना शिकवले असेल, अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट फेकून मारल्यानंतर महाराष्ट्र विधीमंडळात पेपरवेट कायम हद्दपार झाला, हा विक्रमही भाऊंच्या नावावरच आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे खरंतर त्यांचे हिरो होते म्हणूनच विदर्भात सुभाषबाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉकचे जाळे विणण्याचा संकल्प त्यांनी करून एकहाती 18 आमदार निवडून आणण्याची किमया करून दाखवली होती, जे आजवर कुणालाही जमू शकले नाही ते त्यांनी करून दाखवले होते. मात्र, या संसदीय प्रवासात महाराष्ट्रासोबत विदर्भाचे काही भले होऊ शकणार नाही, याची जाणीव त्यांना झाली होती.
विदर्भ स्वतंत्र झाल्याशिवाय इथल्या माणसाला सन्मानाने जगात येणार नाही यावर नितांत जीवन श्रद्धा असणार्या भाऊंनी अखेरच्या श्वासापर्यंत विदर्भाचा एकमेव ध्यास घेतला होता हे महाराष्ट्रात कुणालाही सांगण्याची गरज नाही. भाऊ जांबुवंतराव यांचे संबंध जीवन, त्याग, संघर्ष, समर्पण, जिद्द आणि ध्यासाने भरलेले होते, असा ध्येयाने वेडा झालेला नरकेसरी आता होणे शक्य नाही. 2003 मध्ये वाशिमला लोकमतचा जिल्हा प्रतिनिधी असताना भाऊंची एक मुलाखत घेण्याचा प्रसंग आला तेव्हा मीच दडपणात होतो. परंतु, पहिल्या दहा मिनिटांत त्यांनी पाठीवर हात ठेवून ते ओळखले आणि मला आपणच या विश्वात सर्वात प्रभावी आहोत हे कायम लक्षात ठेव हे पटवून दिले, ते भारावलेले 2 तास अजूनही स्मृतीच्या कप्प्यात साठवून ठेवले आहेत. पुढे त्यांनी, विदर्भासाठी गरज पडली तर नक्षलवाद्यांची मदत घेईल, हे वक्तव्य केल्यावर मी फोन करून प्रतिक्रिया घेतली तेव्हा फोन ठेवण्यापूर्वी भाऊ म्हणाले होते, मला तुझ्यासारख्या नक्षलवाद्यांची गरज आहे. मी काय बोलणार! गुपचूप झालो. फोन ठेवण्याआधी उसना आवाज काढून म्हणालो जय क्रांती! आजही हे सगळे आठवले की अंगावर शहारे येतात. चळवळी, माणसे येतात नि जातात, पण धगधगते अग्निकुंड एखादेच असते ते विझते तेव्हा लाखोंची उब हरवते, या संघर्षाला क्रांतिकारी सलाम!