‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ची अजितदादांकडून पोलखोल
मुंबई : रस्त्यावर खड्डे् दिसले की त्याचे सेल्फी काढून राज्य सरकारला पाठवायचे असे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा छेडले आहे. शुक्रवारी खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच खड्ड्यासोबतचा सेल्फी काढला आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंना सांगून तो ट्विटरवर पोस्ट केला. महाराष्ट्राला खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती; मात्र गेल्या तीन वर्षात रस्त्यांवरच्या खड्ड्यांची संख्या कमी होताना काही दिसत नाही. त्यावर उतारा म्हणून राष्ट्रवादीने ‘सेल्फी विथ खड्डा‘ आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी पवार यांनीही खड्ड्यासोबत सेल्फी काढून धनंजय मुंडे यांना तो चंद्रकांत पाटील यांना धाडण्यास सांगितला. त्यानंतर मुंडे यांनी हे फोटो आणि माहिती ट्विट केली. हे ट्विट आता व्हायरल होत आहे.
कुठे आहे खड्डेमुक्त महाराष्ट्र?
15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची नुसती घोषणाच झाली खड्डे मात्र तसेच आहेत. हल्लाबोल यात्रेदरम्यान सर्वत्र खड्डेच खड्डे आढळून आले. निलंगा-उदगीरदरम्यान स्वतः दादांनीच धनंजय काढ रे जरा खड्ड्यांची सेल्फी अन दे दादांना पाठवून असे सांगितले, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपने निवडणुकीवेळी जाहिरातीमधून कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?, असा सवाल केला होता. त्याच सूरात अजित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रश्न विचारला आहे, कुठे आहे तुमचा खड्डेमुक्त महाराष्ट्र?
सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडले : पवार
राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करीत नाही. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करीत नाही. कुठल्याही शेतमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही. एकंदरित, या सरकारने शेतकर्यांना वार्यांवर सोडले आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी लातूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्यात शुक्रवारी आगमन झाले. त्यानिमित्ताने पवार हे लातुरात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, कापसाला भाव नाही. बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. शेतकर्यांकडील कापूस संपल्यानंतर भाव वाढले. त्याचा फायदा व्यापार्यांना होत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली. पण त्याचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसून येत नाही. ज्या शेतकर्यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केली, त्यांना जाहीर करण्यात आलेले 25 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळत नाही, अशी टीकाही पवारांनी केली.