मुंबई: विधानसभा निवडणुकीत निवडून गेलेल्या विधान परिषद सदस्यांच्या जागेवर या महिन्यात निवडणूक होत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी ही लढत होणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर 24 जानेवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर या जागेसाठी भाजपाकडून राजन तेली यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. संजय दौंड हे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज मंगळवार शेवटचा दिवस आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या जागेवर अगोदर धनंजय मुंडे प्रतिनिधित्व करत होते. मात्र धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या जागेचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यातील असलेल्या संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे माजी राज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. शिवसेनेसोबत युती असल्याने तेली यांनी आधी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र, नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाने शिवसेनेविरोधात रसद पुरविली होती.