पिंपरी-चिंचवड : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हेच या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत पक्षाचे स्टार प्रचारक ठरले आहेत. या निवडणुकांत त्यांच्या सभांना सर्वाधिक मागणी होती. तब्बल 72 जाहीर सभा मुंडे यांच्या झाल्या असून, त्या खालोखाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षासाठी सभा झाल्या आहेत. फडणवीस यांनी 60 सभा घेतल्या आहेत. या दोन नेत्यांनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा क्रमांक लागतो. या दोन्हीही नेत्यांनी प्रत्येकी 40 जाहीर सभा घेतल्या आहेत.
धनंजय मुंडे पहिले, देवेंद्र फडणवीस दुसरे!
निवडणुका आल्या की राजकीय पक्षांना उत्तम वक्तृत्व व लोकप्रियता असलेल्या स्टार प्रचारकांची गरज लागते. अशा नेत्यांनाच उमेदवार आणि पदाधिकारी सभांसाठी गळ घालत असतात. आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि 10 महापालिकांच्या निवडणुकांसाठी घणाघाती भाषणे, ग्रामीण भागाची जाण, जनतेची अचूक नाडी ओळखणे आणि खास मुंडेशैलीतील भाषणे यामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या सभांना सर्वाधिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली होती. त्यामुळे प्रचारासाठी असलेला कमी वेळ आणि मोठ्या प्रमाणातील सभांचे नियोजन या बाबी पाहाता, 72 सभा मुंडे यांनी दिल्या होत्या. प्रत्यक्षात त्यांच्या किमान 100 सभा उमेदवारांना हव्या होत्या. या सर्व सभा दणदणीत झाल्या आहेत. तसेच, त्यांना गर्दीही चांगली लाभली होती. मुंडे यांच्या खालोखाल भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्यात. भाजपकडून ते एकमेव स्टार प्रचारक राहिलेत. निवडणूक धामधुमीत त्यांनीही तब्बल 60 सभांची बाजी मारली. सुरुवातीच्या त्यांच्या सभा चांगल्या झाल्या असल्या तरी शेवटच्या टप्प्यात मात्र त्यांच्या सभांची गर्दी ओसरली होती. पुण्यात तर त्यांच्या शेवटच्या सभेला पुणेकरांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. तरीही सर्वाधिक सभा घेण्यात फडणवीस यांचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो.
राज ठाकरेंच्या सभांना सर्वाधिक गर्दी!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना सर्वाधिक गर्दी झाल्याचे दिसून आलेे. मुंबई आणि पुणे या दोनच महापालिकांसाठी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या. या दोन शहरांत त्यांच्या एकूण दहा सभा झाल्यात. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत 23 तर पिंपरी-चिंचवड व पुणे येथे प्रत्येकी एक सभा अशा 25 सभा झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचे प्रामुख्याने दिसून आले. ठाकरेबंधुंच्या तुलनेत राज ठाकरे यांच्या सभांना सर्वाधिक गर्दी दिसून आली. सभा घेण्यांत तिसरा क्रमांक हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांचा लागतो. या दोन्ही नेत्यांनी प्रत्येकी 40 सभा घेतल्या आहेत. नागपूर येथील शाईफेक वगळता खा. चव्हाण यांच्या सभाही चांगल्या झाल्यात. तर पवारांच्या सभांनीही चांगली गर्दी खेचली होती.
ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या सर्वात कमी सभा
सर्वात कमी सभा या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी घेतल्या आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी केवळ सहा सभा घेतल्यात. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या 30 सभा झाल्या आहेत. ठाकरेबंधु, अजित पवार, खा. अशोक चव्हाण यांच्या तुलनेत धनंजय मुंडे हे फार ज्युनिअर आहेत. तरीही या नेत्यांच्या तुलनेत त्यांच्या सभांना वाढती मागणी ही त्यांची राज्यातील लोकप्रियता दर्शविते. या निवडणुकीत एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम या ज्येष्ठ नेत्यांनीही फारशा सभा घेतल्या नाहीत. अर्थात, त्याला पक्षांतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
मोदींचा प्रभाव पुसण्यात यशस्वी झालो : ना. मुंडे
जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांत सर्वाधिक सभा घेऊ शकलो, याचा आनंदच आहे. खास करून ग्रामीण भागात असलेला मोदी लाटेचा प्रभाव हा वस्तुनिष्ठ मांडणी करून पुसू शकलो. मोदींच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागालाच बसला होता. त्यामुळे तेथील मतदारांना सरकारच्या चुकीच्या धोरणांची जाणिव करून दिली. ग्रामीण भागात निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व सहकार्यांचा माझ्या सभेसाठी आग्रह होता. त्यांच्या आग्रहाखातर सभा घ्याव्या लागल्यात. सरकारच्या विरोधात मांडणी करत गेलो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी या सभांना होऊ शकली, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना केले. भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण तुमच्या धडाकेबाज सभांनी झाली, याबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की मुळात मी स्व. मुंडेसाहेबांसोबत सावलीसारखा वावरलो आहे. माझे नेतृत्वच ग्रामीण भागातून आले आहे. त्यामुळे माझ्या सभांवर त्यांची छाप असणे सहाजिक आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत त्यांची उणिव भासत होती. ती उणिव जर राज्यात माझ्या सभांनी भरून निघाली असेल तर त्याबद्दल आनंदच आहे. पक्षाच्या बाजूने मतदारांचा कौल मागताना सरकारच्या विरोधात सत्य आणि वस्तुनिष्ठच मांडणी केली. त्याचा परिणाम मतदारांवर नक्कीच होईल, असा विश्वासही ना. मुंडे यांनी व्यक्त केला.
सभा व नेते
धनंजय मुंडे – 72
देवेंद्र फडणवीस – 60
खा. अशोक चव्हाण – 40
आ. अजित पवार – 40
आ. सुनील तटकरे – 30
उद्धव ठाकरे – 25
राज ठाकरे – 10
शरद पवार- 06