मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची क्लिप व्हायरल होत आहे. यावरून पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आता राज्य महिला आयोग धनंजय मुंडेंना नोटीस बजावणार आहे.
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका करताना, पंकजा यांना बहिणबाई म्हटले. तसेच, आमच्या बहिणबाईंच्या शब्दाला किंमत आहे, कारण त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. तर, आम्ही पंडित आण्णांचे पुत्र असल्याने आमच्या शब्दाला कमी किंमत असल्याचे धनंजय यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर धनंजय मुंडेंचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबाबत खालच्या शब्दात टीका केली होती. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी धनंजय मुंडेंच्या अटकेची मागणी करत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य महिला आयोगाकडेही धनंजय मुंडेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून राज्य महिला आयोगाकडून याची गंभीर दखल घेतली जात आहे. याप्रकरणी लवकरच धनंजय मुंडेंना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत धनंजय मुंडे यांनी देखील खुलासा केला आहे. शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिले आहे.