धनगर समाजाचे नेते नाराज, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ठोस निर्णय नाही
मुंबई:- धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने पुन्हा ‘तारीख पे तारीख’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारच्या बैठकीनंतर समाजाच्या नेत्यांनी सरकारच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली. भाजपाच्या धनगर नेत्यांनी मात्र ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली बैठक सकारात्मक झाल्याचे स्पष्ट केले. प्रकाश शेंडगे व राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाजातील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मंत्री महादेव जानकर, मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. विकास महात्मे, आ. रामहरी रुपनवर, आ. रामराव वडकुते, माजी मंत्री प्रकाश शेंडगे, आ. नारायण पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
30 ऑगस्टला येणार अहवाल!
टाटा सामाजिक संस्थेचा धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल येत्या 30 ऑगस्टला येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना सांगितल्याचे समजते. हा अहवाल आल्यानंतर एक महिना या अहवालाचा अभ्यास केला जाईल व त्यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे एवढे दिवस वाट बघितलीत आता अजून एक महिना वाट बघा असेही त्यांनी म्हटल्याचे समजते. यावर राष्ट्रवादीचे आ. रामराव वडकुते व प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त करून मग आजच्या बैठकीचे प्रयोजन काय, असे विचारल्याचे समजते. जर टाटा संस्थेचा अहवाल 30 ऑगस्टला येणार असेल तर मुखमंत्र्यांनी ही बैठक दोन दिवसांनी बोलवायला पाहिजे होती, असे या दोघांनी म्हटले. एकंदर सरकार अजूनही दिरंगाईच करतेय असे चित्र दिसते आहे. त्यामुळे आम्हाला सरकारविरोधात पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.
सह्याद्रीबाहेर ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’
काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीला साधारण पंधराच नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी होते. पण ज्या धनगर आरक्षण कृती समितीने बारामतीसह राज्यभरात आरक्षणासाठी रान उठवले होते. सत्तेत येण्याआधी ज्या समितीला फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे कबूल केले होते, त्या समितीतील प्रतिनिधींना आजच्या बैठकीत सहभागी व्हायला द्यावे, अशी धनगर समाजातील कार्यकर्त्यांची मागणी होती. या समितीतील शशीकांत तरंगे यांनी तसा प्रयत्नही केला होता. परंतु त्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून या समितीतील कार्यकर्त्यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ अशा घोषणा दिल्या. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना शांत केले.