अन्यथा मेट्रो, महापालिकेचे काम बंद पाडू
पिंपरी : अहिल्यादेवी पुतळ्याची जागा हलवण्याचा प्रयत्न केल्यास मेट्रो आणि महापालिका दोन्हींचे कामकाज तीव्र आंदोलन करुन बंद पाडु असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर धनगर समाज महासंघाच्यावतीने आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर राहुल जाधव तसेच मेट्रोचे सहाय्यक मुख्य अधिकारी गौतम बिर्हाडे यांना देण्यात आला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे, लक्ष्मण रुपनर, राजाराम भोंडवे, जितेंद्र मदने, रुक्मिणी धर्मे आदींनी आपल्या मागणीचे निवेदन महापालिकेत दिले आहे. या निवेदनात असेही म्हटले आहे की, त्याच बरोबर पुतळ्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल त्यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्त, महापौर, मेट्रोचे अधिकारी यांची व शहरातील प्रमुख धनगर समाज कार्यकर्त्यांची संयुक्तपणे बैठक घेतली पाहिजे. सर्व धनगर समाजाला विश्वासात घेऊनच निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय पुतळ्याच्या मागे असणार्या जागेतुन 10 गुंठे जागा महापालिकेने विकत घेऊन त्या जागेत पुतळ्याचे सुशोभीकरण करावे. अन्यथा शहरात मध्यवर्ती ठिकाणी किमान 2 एकरच प्लॉट समाजासाठी द्यावा, अशा प्रकारची मागणीसुध्दा यावेळी करण्यात आली.
हे देखील वाचा
अपेक्षित असाच निर्णय घेऊ
यावर उत्तर देतांना महापौर म्हणाले की, तुमच्या समाज बांधवांना अपेक्षित असाच निर्णय तुमच्या सर्वांच्या साक्षीने घेण्यात येईल आणि धनगर समाजाच्या भावनांचा आदर राखला जाईल. जो पण तोडगा काढायचा आहे तो कायमस्वरुपी असेल असाच काढला जाईल याची शाश्वती देत आहे. मेट्रोचे अधिकारी गौतम बिर्हाडे यांनी सांगितले की, आम्ही मेट्रो प्रशासन महापौर, आयुक्त आणि धनगर समाज यांनी मिळुन घेतलेल्या निर्णयाला बांधील असणार आहोत. तुम्ही सर्वजण मिळुन जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल अशा प्रकारची कबुली दिली. येत्या आठवड्यात ही बैठक घेण्यात येईल.