विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन; मतभेद विसरून समाजबांधव एकवटले
धनगर समाजाने नोंदविला शासनाचा निषेध
धुळे । येळकोट, येळकोट जय मल्हारचा गजर करीत धनगर समाजाने मतभेद विसरुन एकतेचे दर्शन घडविले. सोमवारी १८ रोजी समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी एकतेची वज्रमुठ उगाली. धनगर समाजाच्यावतीने क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजावर होणार्या अन्यायाविरोधात मोर्चा काढत राज्यातील फडणवीस सरकार विरोधी निदर्शने करीत शासनाचा निषेध नोंदविला. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने धनगर समाजाने मुकमोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पारोळा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाज एकवटला. या मोर्चात महिला आणि बालकांची संख्या लक्षणीय होती. सर्व पक्ष, संघटना भेद विसरुन धुळ्यात निघालेला हा विराट मोर्चा राज्यातील पहिला मोर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
अनेकांनी व्यक्त केले मनोगत
मोर्चा सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी झाली नाही. अत्यंत शिस्तबध्दपणे हा मुकमोर्चा दुपारी उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून धडकला. मोर्चा सुरु होण्यापुर्वी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्याच अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही आरक्षणाबाबतीत विचार झालेला नसल्याने फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविले आहे. त्यामुळे धनगर समाजाने आता जागा झाले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अधिकार्यांविरोधात रोष
राज्यात अनेक ठिकाणी वनविभागाच्या अधिकार्यांची मुजोरी वाढली असल्याने अधिकार्यांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यांना सरकारने वठणीवर आणावे, पिसुर्डी येथील बालिकेचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली. तसेच धुळे तालुक्यातील हडसुणे येथील चिंतामण ठेलारी या मेंढपाळाला मारहाण करुन वनविभागाने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. या आणि इतर मागण्यांसाठी धनगर समाजाचा मोर्चा निघाला होता.
महिला, तरुणींचा सहभाग
धनगर समाजच्या मोर्चात महिला व तरुणींची संख्या ही लक्षणीय होती. अतिशय दुर्गम भागातून, गाव पाड्यातून महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तर उच्च शिक्षित मुली व तरुणीनींही मोर्चात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या सभास्थळी मोर्चेकरी येऊन थांबले. त्याठिकाणी ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी धनगर समाजातील काही पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हा काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षांनी देखील धनर समाजाला मोर्चासाठी पाठींबा दिला होता.