धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भारत सरकार व राज्य शासन साजरे करीत आहे. केंद्र सरकारने भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजातील सवलतीस पात्र नवउद्योजक महिलांसाठी स्टँडअप इंडिया ही योजना कार्यान्वित केली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजातील सवलतीस पात्र असणाऱ्या महिला उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. सन 2021- 22 या आर्थिक वर्षात धनगर समाजातील महिला नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांनी दहा टक्के स्व- हिस्सा भरल्यानंतर व बँकेने या योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट सबसिडी प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेसाठी धुळे जिल्ह्यातील पात्र इच्छुकांनी आपला अर्ज विहित कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सिंचन भवनच्या मागे, साक्री रोड, धुळे) येथे सादर करावा, असे सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे