चोपडा । धनगर समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी अनेक मोर्चे काढलेत, या एकजुटीमुळे शासानाने दखल घेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी टीस समितीची नेमणूक केली आहे. त्या समितीच्या सदस्यांकडे आपण मागासलेले आहोत हे पुरावे द्या त्यावरच आपणास आरक्षण मिळणार आहे. जोपर्यंत आपणास आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले. येथील महिला मंडळ विद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये धनगर समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. धनगर समाजातील प्रत्येकाने एकजुटीने झटले पाहिजे, असे सांगत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) या समिती सदस्यांसमोर पुरावे सादर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास समाजातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.चे शिक्षण सभापती सुरेश धनके हे होते तर, प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुनीता महात्मे (नागपूर ), रामेश्वर पाटील , नवनिर्वाचित जि.प.सदस्या उज्जवला म्हाळके,आत्माराम म्हाळके, नगरसेवक महेंद्र धनगर, सरला शिरसाठ, शरद कंखरे, मंदाताई न्याहळदे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर धनगर, माजी सरपंच मधुकर कंखरे, जळगावचे माजी महापौर सदाशिव ढेकळे , जि.प.सदस्य राजधर पांढरे, रवींद्र कुईटे, संदीप सावळे, अरुण कंखरे,वर्डी सोसायटीचे उपाध्यक्ष भगवान न्हायदे, आदिंसह जिल्ह्यातील नवनिर्वाचित जि.प.व पं.स.सदस्य तसेच नगरसेवक व सरपंच मंचावर उपस्थित होते. यावेळी सर्व प्रथम अहिल्याबाई होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे व त्यांच्या धर्मपत्नी डॉ.सुनीता महात्मे यांचा जिल्ह्याच्या वतीने भव्य सत्कार डॉ.नरेंद्र शिरसाठ व अन्य पदाधिकार्यांनी पारंपरिक काठी व घोंगडे देऊन करण्यात आला.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
यावेळी रामेश्वर धनगर, आत्माराम म्हाळके, प्रदेश प्रमुख धनगर समाज संघर्ष समिती बापू शिंदे, डॉ.सुनीता महात्मे, अरुण कंखरे, जि.प.सभापती सुरेश धनके आदिंनी मनोगत व्यक्त केले. यात समाजातील सर्व पोटशाखा भेद विसरून एकजुटीने राहणो यासाठी रोटी व्यवहारासोबत बेटी व्यवहार देखील करणो, साखरपुडा पद्धत बंद करणो, सामूहिक विवाहांचे आयोजन करणो असे ठराव पारित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगराज न्हायदे व योगिता न्हायदे यांनी तर प्रास्ताविक डॉ. नरेंद्र शिरसाठ यांनी तर आभार दत्तू धनगर यांनी व्यक्त केले.