पुणे । राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होत आहे. 2019च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस धनगर समाजाला आरक्षण मिळवून देतील, अशी ग्वाही राम शिंदे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राम शिंदे यांनी अशाप्रकारे कबुलीने देऊन भाजपाला घरचा आहेरच दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांसह धनगर आरक्षणावर आपली भूमिका मांडली.
नवा संशोधन अहवाल संस्थेकडून येणार आहे
शिंदे म्हणाले, धनगर आरक्षणाबाबत बार्टी या संस्थेला शासनाने संशोधनाचे काम सोपवले होते. त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेकडे आरक्षणाबाबत नवा संशोधन अहवाल तयार करण्याची जबाबदार देण्यात आली आहे. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन भाजापने दिले होते. मात्र, अद्याप आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे समाजात सरकारविरोधात रोष पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होत असल्याची कबुली शिंदे यांनी दिली. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात शिंदे म्हणाले, या मागणीचा पाठपुरावा मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील अनेक वेळा करण्यात आला आहे. लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा करणार आहे.