पंढरपूर। मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही, असे वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी हे विधान केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीने गेल्या काही दिवसांपासून जोर धरलेला असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आरक्षणाबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि आरक्षणामुळे मी मंत्री झालेलो नाही, असे ते म्हणाले. मागील लोकसभा निवडणुकीत मला धनगरांची मते मिळालेली नाहीत. त्यांनी मते दिली असती तर आज मी केंद्रात कॅबिनेट मंत्री असतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. जानकर यांनी मराठा समाज आरक्षणावरही भाष्य केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षण रखडले, असा आरोप त्यांनी केला. आरक्षणाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे घिसाडघाई करून काही फायदा नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेल्या वादावरही आपले मत मांडले. राजू शेट्टी आणि खोत यांच्यातील वाद सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मध्यस्थी करणार आहे. या सर्वांना एकत्र आणण्याचे काम मी करणार आहे, असे ते म्हणाले.