धनगर सिध्दरामय्या हिंदूविरोधी कसे?

0

सिद्धरामय्या हे जुने जनता दलातले नेते. धनगर समाज त्यांच्या मागे आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. प्रशासन चालवण्यात ते उजवे ठरलेत. काँग्रेस पक्ष त्यांच्यामागे एकमुखी आहे. ओबीसी, दलित, मुस्लिम यांचा मुख्यमंत्री अशी प्रतिमा त्यांनी बनवलीय. अशा सक्षम नेत्याच्या तावडीतून भाजपला कर्नाटक खेचायचा आहे. म्हणूनच कर्नाटक जिंकण्यात सिद्धरामय्या हा मोठा अडथळा आहे, हे शहांसारख्या चतुर राजकारण्यानं जोखलं आहे. मुळावर घाव घालायचा म्हणून शहांनी कर्नाटकात मागच्या आठवड्यात सिद्धरामय्या हिंदूविरोधी आहेत अशी गर्जना केलीय. पण जातीनं धनगर असलेले सिद्धरामय्या जीवनशैलीनं हिंदू आहेत. अमित शहांच्या डोक्यातला हिंदू धर्म वेगळा असेलही. पण त्याआधारे ते सिद्धरामय्यांचं हिंदूपण काढून कसं घेऊ शकतील?

या लेखाचं शीर्षक काहींना खोडसाळ वाटू शकेल? मलाही ते फारसं आवडलेलं नाही. पण राजकारणातले राजकीय नेत्यांचे डावपेच आपल्या आवडीनिवडी पलीकडचे असतात. या वर्षात कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं तिथं राज्य सरकार आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून सत्ता खेचून घ्यायची, असा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रयत्न आहे.

कनार्टक हे दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य आहे. 6.11 कोटी लोकसंख्या असलेलं हे राज्य देशात आठव्या क्रमांकावर आहे. 30 जिल्हे आणि 4.90 कोटी मतदार. विधानसभेचे 224 आमदार आहेत. उत्तर, दक्षिण आणि समुद्र किनारपट्टीचा प्रदेश अशा तीन भागात ते वसलेलं आहे. दक्षिणेकडच्या या एकमेव राज्यात 2008 ते 2013 या काळात भाजपची सत्ता होती. बी. एस. येडीयुरप्पा तेव्हा मुख्यमंत्री होते. ते खाण घोटाळा प्रकरणात तुरुंगात गेले आणि इथं भाजपची राजवट बदनाम होऊन काँग्रेस पक्ष 2013 मध्ये सत्तेवर आला. मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जाणं हा तेव्हा भाजपला मोठा धक्का होता. पाच वर्षांत भाजपच्या राज्यात तीन मुख्यमंत्री द्यावे लागले. पक्षांतर्गत भानगडी-कुलंगडी-भांडणं विकोपाला गेली आणि भाजपची हार झाली. तेव्हा ज्या येडीयुरप्पांनी कर्नाटकात भाजपला डुबवलं, त्यांनाच आता परत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करून भाजप पुन्हा सत्ता मिळवण्याचं स्वप्न बघत आहे. त्यासाठी डावपेच आखत आहे. निवडणूक जिंकण्याच्या डावपेचाच भाग म्हणून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ‘मुल्ला सिद्धरामय्या’ म्हणत ते घोर हिंदू विरोधी आहेत असं जाहीर केलं आहे. या राज्यात मुस्लिमांची संख्या 12 टक्के आहे. 224 पैकी 35 आमदारांच्या प्रत्येक मतदारसंघात मुस्लिम मतं 20 टक्क्यांच्या आसपास आहेत. हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा भाजप विरुद्ध हिंदूविरोधी अशी विभागणी केली तर हिंदू मतं संघटित होतात. त्यातून ‘हिंदू वोट बँक’ तयार होते. निवडणुका जिंकता येतात, हे भाजपचं सूत्र आहे. उत्तर प्रदेश, गुजरात विधानसभांच्या निवडणुकांत हे सूत्र वापरून भाजपनं सत्ता मिळवली. तोच प्रयोग कर्नाटकात भाजपला करायचा आहे. भाजप नेते कन्नड मतदारांत धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नांत असले तरी ते होण्यात काही अडचणी आहेत. या राज्यातली जातीय समीकरणं भाजपला त्रासदायक आहेत. भाजपची या राज्यातली प्रतिमा लिंगायत आणि ब्राह्मण समाजाचा पक्ष अशी आहे. कर्नाटकात लिंगायत (17 टक्के), वक्कलिग (15 टक्के), कुरुबा धनगर (8 टक्के), दलित (23 टक्के), मुस्लिम (12 टक्के) आणि उरलेल्यांत ब्राह्मण, मागासवर्गीय (ओबीसी) छोट्या जाती येतात. लिंगायत, वक्कलिग, धनगर या तीन हिंदू जातींचं कर्नाटकच्या राजकारणावर वर्चस्व आहे. या तिन्ही जाती आपल्याला नेत्याला मत देतात. पक्ष बघत नाहीत. म्हणून सध्या या तीन नेत्यांभोवती कर्नाटकचं राजकारण फिरतंय. येडीयुरप्पा हे लिंगायत आहेत. ते भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. सिद्धरामय्या धनगर आहेत. ते काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. एच. डी. देवेगौडा हे वक्कलिग समाजाचे नेते. त्यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) हा पक्ष आहे. त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी हे या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडतात म्हणून सिद्धरामय्या हिंदूविरोधी असं भाजप म्हणतो. सिद्धरामय्या हे कर्नाटक गेल्या पाच वर्षात काँग्रेस काळात जॉब आणि रोड निर्मितीत कसा पुढे आहे आणि त्यामुळे राज्याचा कसा विकास होतोय हे सांगत आहेत. बेंगलुरू ही आयटी सिटी बनवून जॉब दिले, हे पटवण्यात सिद्धरामय्या काहीसे यशस्वी ठरताना दिसताहेत. कर्नाटकातले रोड चांगले असल्याचं बोललं जातंय. या मुद्यांवर भाजपपेक्षा काँग्रेसचं पारडं जड दिसतंय. म्हणून विकासाच्या मुद्याऐवजी भावनिक मुद्यांवर निवडणूक न्यायचा भाजपचा प्रयत्न दिसतोय.

कर्नाटकात महादायी नदीच्या पाण्याचा प्रश्‍न गेली 30 वर्षं भिजत पडलाय. कर्नाटक गोवा राज्यातल्या पाणी वाटपाचा हा वाद आहे. गोव्यातल्या महादायी नदीतुन 7.56 टीएमसी फूट पाणी कर्नाटकच्या कलसा-भांदुरी नाला प्रकल्पात सोडायचं. त्यामुळे हुबळी, धारवाड या शहराची तहान भागते. पण हे पाणी देण्यास गोवा भाजप सरकार टाळाटाळ करतंय, कर्नाटकावर अन्याय करतंय, असा सिद्धरामय्यांचा आरोप आहे. या प्रश्‍नापायी कालच्या 25 जानेवारीला कर्नाटक बंद होतं. गोव्यातलं पर्रीकर-भाजप सरकार अडवणूक करतंय, केंद्रातलं मोदी सरकार दुर्लक्ष करतंय, कन्नड जनता येत्या निवडणुकांत या रागातून भाजपला धडा शिकवेल असं सिद्धरामय्या बोलतात. जात विरुद्ध धर्म अशी लढाई उभी राहिली की, धर्मांध नेहमी हरतात. गुजरातमध्ये हार्दिक पटेल आणि पाटीदार समाजाला हिंदूविरोधी ठरवता आलं नाही हे दिसलं आहे. कर्नाटकातही जात विरुद्ध धर्म अशी दुफळी करण्याचा प्रयत्न होतोय, त्यात कोण बाजी मारणार हे पुढच्या काळात उलगडत जाणार आहे.

– राजा कांदळकर
संपादक, अक्षरनामा मुंबई
9987121300