रावेर : केंद्र सरकारतर्फे सध्या हिटलरशाहीसारखे निर्णय घेतले जात आहे. ज्यामुळे सर्वसाधारण जनता त्रस्त आहे. नगरपालिकेत भाजपा धनशक्तिच्या जोरावर विजय मिळाला परंतु ग्रामीण भागातील मतदार सुज्ञ आहे त्यामुळे राष्ट्रवादीचेच उमेदवार निवडून येतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. सतिष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या सभागृहात पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर हाजी गफ्फार मलिक, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, विकास पवार, काशीनाथ इंगळे, योगेश जेसले, प्रल्हाद बोंडे आदी उपस्थित होते. यावेळी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदशन केले. यावेळी मोठ्या संखेने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी काही युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
यावेळी मेळाव्यात तालुकाध्यक्ष सोपान पाटील, युवक अध्यक्ष दीपक पाटील, सेवादलचे प्रकाश पाटील, माया बार्हे, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्या विजया पाटील, गोटूशेट, किशोर पाटील, सचिन पाटील, रमेश पाटील, सीताराम पाटील, पिंटू महाजन, कृष्णराज पाटील, गणेश चौधरी, रविंद्र पाटील, राजेंद्र पाटील, पी.आर. पाटील, लक्ष्मण मोपारी, शकुंतला महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील कोंडे यांनी केले.
मलिक यांच्या सुचना
रावेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका मेळावा घेण्यात आला. मात्र या मेळाव्यात तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फारशी उपस्थिती दिसून आली नाही. त्यामुळे या मेळाव्याला कमी असलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षात घेता रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी नियोजन व संपर्कावर लक्ष देवून कार्यकर्त्यांची फळी उभारावी, अशी सुचना राष्ट्रवादी प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी करुन तालुका पदाधिकार्यांचे कान टोचले.