धनाजी नाना महाविद्यालयात गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन

0

प्रकल्प महाविद्यालय स्तरावर आदर्श उपक्रम -कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील

फैजपूर- धनाजी नाना महाविद्यालय येथील प्राणिशास्त्र विभागाद्वारे उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू यांनी हा प्रकल्प हा महाविद्यालय स्तरावर एक आदर्श उपक्रम असून अधिकाधिक लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचवावा तसेच या प्रकल्पाच्या संबंध उपक्रमाची नोंद ठेवावी, अशी सूचना प्रसंगी केली. विद्यापीठातील व्यवस्थापन परीषदेचे ज्येष्ठ सदस्य दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयातील कचर्‍याचे खत निर्मितीसाठी वापर
विभाग प्रमुख प्रा.विलास बोरोले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रकल्प संयोजक डॉक्टर सागर धनगर यांनी उपस्थितांना प्रकल्पाची माहिती दिली. महाविद्यालय परीसरातील जमा होणारा विघटनशील कचरा हा गांडूळ खत निर्मितीसाठी वापरला जातो. परीसरातील कचर्‍याचे व्यवस्थापन तसेच सेंद्रिय खताची निर्मिती या गांडूळखत प्रकल्पातून केली जाते. शेती व्यवस्थापनातील खतांवर होणारा खर्च गांडूळ खत निर्मितीतून मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो, असे या ठिकाणी नमूद करण्यात आले.

शेतकर्‍यांसाठी प्रकल्प फायदेशीर
शेतकरी मित्रांना या उपक्रमाच्या माध्यमातून शेती पूरक व्यवसाय उभारता येऊ शकेल त्याकरीता महाविद्यालयाचा प्राणिशास्त्र विभाग सतत कार्यरत राहील, अशी ग्वाही विभाग प्रमुख प्राध्यापक विलास बोरोले यांनी दिली. विद्यार्थी तसेच प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.राजश्री नेमाडे यांनी केले.