धनाजी नाना महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘आविष्कार 2018′ चे थाटात उद्घाटन

0

समाजातील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे -ब्रिटीश संशोधक भरतजी अग्रवाल

फैजपूर- तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्हा स्तरीय अविष्कार 2018 चा उद्घाटन सोहळा दिनांक 27 डिसेंबर 2018 पार पडला. समाजात शांतता आणि समृद्धता वाढावी या उद्देशाने तरुणांमधील संशोधन प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने अविष्कार 2018 चे आयोजन करण्यात आले. आयोजनमागील भूमिका मांडताना प्रास्तविक प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी मांडली. जळगांव जिल्हा समन्वयक उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे यांनी असा बहुमान आपल्या महाविद्यालयाला मिळाला याचा आनंद व्यक्त केला.

गरज ही शोधाची जननी -आमदार चौधरी
गरज ही शोधाची जननी असते, ज्यांना प्रश्न पडतात त्यांचे प्रश्न सुटतात.विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनाचा आनंद तर घ्यावा पण आपण समाजाचे काही देणे लागतो, संशोधन वृत्ती बाळगावी, आपल्या सातपुडा परीसरातील समस्यांच्या अभ्यासासाठी ऑस्ट्रेलियन व ब्रिटिश संशोधक गेल्या 10 वर्षांपासून येत आहेत म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरतजी अग्रवाल यांना आपल्या विद्यापीठाचे संशोधक आमच्या आदिवासी परीसरात अभ्यासासाठी पाठवावेत, असे आवाहन माजी आमदार चौधरी यांनी केले.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी, उद्घाटक प्र.कुलगुरू पी.पी.माहुलीकर, गुलशनजी रेलन, भरत अग्रवाल, आमदार डॉ.सुधीर तांबे, प्रा.नितीन बारी, डॉ.बी.व्ही.पवार, प्रा.एम.टी.फिरके, प्रा.तुकाराम जी.बोरोले, सतीश भोळे, प्रा.पी.एच.राणे, डॉ.ओ.एन.भोगे, डॉ.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.के.जी.कोल्हे, प्रा.टी.जे.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.व्ही.आर.पाटील, समव्ययक जळगाव जिल्हा अविष्कार 2018 उपप्राचार्य प्रा.ए.जी.सरोदे, उपप्राचार्य अनिल भंगाळे, प्रा.डी.बी.तायडे, डॉ.उदय जगताप, प्रा.प्रभात चौधरी, शैलेंद्र राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

आविष्कारातून सुटतील समस्या -भरतजी अग्रवाल
भारताच्या मूळ समस्या शोधण्याचं काम ग्रामीण महाविद्यालयातील अशा आविष्कार सारख्या कार्यक्रमातून होत असते. शिक्षणाने अनेक संधी उपलब्ध होतात त्यामुळे संधी शोधत राहणे व समाजातील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे. आमचा असा समज होता की शहरातील विद्यार्थांनी, संशोधकांनी देशाच्या समस्यांच्या शोध घेऊन मार्ग काढावे पण फैजपूरसारख्या ऐतिहासिक ग्रामीण भागात आविष्कार स्पर्धेच्या आयोजना संदर्भातील भव्यता पाहुण खुपच समाधान वाटले. या स्पर्धेसाठी 900 विद्यार्थांनी सहभाग नोंदवून आशावाद निर्माण केला की आजची तरुण पिढी केवळ सोशल मिडिया व मोबाईलमधेच अडकलेली नाही, असे विचार भरतजी अग्रवाल यांनी व्यक्त केले.

मानवात जन्मजात संशोधन वृत्ती -पी.पी.माहुलीकर
प्र-कुलगुरू पी.पी.माहुलीकर यांनी संशोधन वृत्ती मानवामध्ये जन्मजात आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यापीठातून 48 विद्यार्थी निवडले जातील व त्यांना राज्यस्तरीय संशोधन कार्यक्रमांत भाग घेता येईल, असे प्र.कुलगुरू पी.पी.माहुलीकर म्हणाले. नाविण्यपूर्ण कलाविष्काराचा विकास करावा, विद्यार्थ्यांनी पुढे येऊन शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी संशोधन करावे, वेस्टेज वस्तूचा उपयोग, आई-वडीलांच्या कामच ताण कसा कमी करता येईल यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.