धनादेश वटत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप

0

यावल । वारंवार चोपडा बाजार समितीकडे व्यापार्‍यांच्या तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने किनगावच्या शेतकर्‍यांनी थेट बाजार समितीच्या नोटीस बोर्डावर आपल्या व्यथा लिहून संताप व्यक्त केला आहे. नोटबंदीमुळे कॅशलेस व्यवहार होत असून खात्यात पैसे नसतानादेखील व्यापारी धानादेश देतात. हे धनादेश बँकेत सादर केल्यानंतर बाऊन्स होत असल्याने शेतकर्‍यांची अडचण वाढली आहे.

बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता
किनगावातील शेतकरी गोपाळ बारी, विजय अस्वार भरत पाटील यांनी चोपडा बाजार समितीच्या अडावद येथील उपबाजारात खासगी व्यापार्‍यांना 13 डिसेंबर 2016 रोजी कांदा विकला होता. मात्र, शेतकर्‍यांना कांद्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शेतकर्‍यांना मोबदल्यापोटी व्यापार्‍यांकडून धनादेश देण्यात आले. शेतकर्‍यांनी कांदा दिल्यावर व्यापार्‍यांनी 15 डिसेंबर 2016चा धनादेश दिला होता. मात्र, संबंधितांच्या खात्यात पैसे नसल्याने 4 जानेवारी 2017 चा धनादेश दिला. हा धनादेश बँकेत दिल्यानंतर व्यापार्‍याच्या खात्यावर पैसे नसल्याचे समोर आले. याबाबत शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे कैफियत मांडली. अडावदच्या स्थानिक व्यवस्थापन मंडळाने दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन शेतकर्‍यांना दिले होते. त्यामुळे व्यापार्‍याने पुन्हा 27 जानेवारी 2017 या तारखेचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेशही वटला नाही. त्यामुळे बाजार समितीकडे समस्या मांडूनही अडचण कायम असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. संतप्त शेतकर्‍यांनी थेट अडावद उपबाजारातील नोटीस बोर्डावरचं आपली व्यथा मांडली आहे. किमान आतातरी बाजार समितीला जाग येईल, अशी अपेक्षा आहे.