विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी अख्ख्या राज्याचे लक्ष लागून असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सादर केला. यावेळी त्यांची शैली आणि बॉडीलँग्वेज ही खरोखर काबिलिये तारीफ होती. विरोधी पक्षांवर आसूड ओढत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा आवाज आजही कायम होता. मात्र धार कुठेतरी कमी पडल्यासारखी वाटत होती. ही धार वाढविण्यासाठी आज टाळ आणि भजन, आरतीच्या माध्यमातून ‘हरी’नामाचा सहारा घेतला. बोंबाबोंब करून आणि काहींनी अगदी नृत्य करून देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आजही लावून धरली.
असो, आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आकड्यांचा अफाट खेळ खेळला. आणि सबगोलंकारी असा अर्थसंकल्प मांडला. काही गोष्टींसाठी त्यांचे खरोखर कौतुक व्हायला पाहिजे. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन असेल किंवा महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा आणि मराठी भाषा संवर्धन आदिसारखे काही मुद्दे प्रभावी मानले जाऊ शकतात. विरोधकांनी आज टाळ वाजवित माऊलीचा, हरिनामाचा गजर सुरु केला. विठ्ठल नामाचाही अधून मधून गजर सुरु होता. गणपतीच्या आरत्या आणि घालीन लोटांगणसह शिमग्याच्या बोंबाही मारण्यास सुरवात केली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांन वारंवार तंबी देऊनही हे सदस्य जागेवरुन काही हटत नव्हते.काही सदस्यांनी हातामध्ये आश्वासनाचे गाजर असे बॅनर घेऊन सभागृहात प्रवेश केला होता. बॅनर कॅमेऱ्यासमोर घेऊन अनेकदा त्यांनी अर्थमंत्र्यांनी झाकोळन्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या दमदार आवाजापुढे झाकोळले गेले.
अर्थमंत्र्यांनी ‘मुश्किले जरुर है, मगर ठहरा नही हू मै ! मंजिल से जरा कह दो, अभी पहूंचा नही हूँ मै !कदमो को बांध न पाएगी मुसिबत की जंजिरे, रास्तों से कह दो अभी भटका नही हूँ मै !’ असा दमदार शेर म्हणत आपल्या जोरदार अस्तित्वाची जाणीव सभागृहाला आल्या आल्या करून दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला अनेकदा करून देऊन त्यांनी नेमके काय साधले? हे मात्र लक्षात आले नाही. विधानसभेच्या अध्यक्षांच्या सेन्स ऑफ ह्युमरची चर्चा अनेकदा होते. आजही त्यांनी तो दाखवला आणि सभागृहाला खळखळून हसायला भाग पाडले. मद्यावरील कराचा विषय सुरु असताना सभागृहात गोंधळ घालणारे सदस्य काही वेळ शांत राहिले होते. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी ‘अर्थमंत्री तुम्ही बोलणे सुरु ठेवा. आता, गोंधळ होत नाही’. असे सांगितल्याने सभागृहात हास्याचा फवारा उडाला. खुद्द अर्थमंत्री मुनगंटीवारही आपले हसू आवरु शकले नाही.
कालपर्यंत आक्रमक भूमिकेत असलेल्या शिवसेनेच्या आजच्या चुप्पीची मात्र चर्चा सर्वत्र होत आहे. कदाचित याचमुळे विरोधी पक्षाने आज नव्या घोषणांना देखील जन्म दिला. फसवलं रे फसवलं शिवसेनेला फसवलं, काढले रे काढले येड्यात काढल अशा घोषणा विरोधकांनी सेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना उद्देशून दिल्या. कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय अर्थसंकल्प सादर करू देणार नाही अशी भूमिका घेणारी आक्रमक सेना आज शांत दिसली. नेमकं कुठलं लॉलीपॉप सेनेला मिळाल? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान आज शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांचा विरोध देखील क्षीण झाल्यासारखा वाटला. आता बुधवारच्या आधी काय -काय खलबते होतात? शेतकऱ्यांसाठीचा हा आवाज कायम राहतो की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाकी आज पंढरीच्या पांडुरंगाचा जो नामघोष सभागृहात झाला तो अफाट होता. त्यामुळे सभागृह देखील धन्य झाले आणि अर्थसंकल्प देखील धन्य झाला असेल.
– निलेश झालटे
9822721292