भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमधील दलितांच्या शोषणाच्या वाढत्या घटनांमुळे काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची धमकी दिली. याच मायावतींनी उत्तर प्रदेशमधील 2007 सालच्या विधानसभा निवडणुुकीत पक्षाचे बोधचिन्ह असलेल्या हत्तीचा कौशल्यपूर्ण वापर करत, हाथी नहीं गणेश है। ब्रम्हा, विष्णू महेश है ये। असा नारा देत भारतीय राजकारणात सोशल इंजिनीअरिंगचा यशस्वी प्रयोग केला होता. मायावतींना सोशल इजीनीअरिंंगचा हा प्रयोग करायला लावणारे सतीश मिश्र हे आजही मायावतींच्या किचन कॅबिनेटचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करण्याची मायावतींच्या धमकीमुळे धक्का बसणे स्वाभाविक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. पण मायावतींच्या या धमकीमागे सुप्त राजकीय मनीषा लपलेली आहे नक्की. उत्तर प्रदेशमधील दलित मतदार ही मायावतींची सर्वात मोठी ताकद होती. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या ताकदीचा करिष्मा पाहायला मिळाला नाही. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती यावर्षी राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. लोकसभेच्या मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी एकही जागा मायावतींना जिंकता आलेली नाही. त्यावेळी निर्माण झालेल्या मोदी लाटेत उत्तर प्रदेशातील बहुसंख्य दलित मते भाजपकडे गेली होती. या पराभवामागची कारणे शोधण्यासाठी बसपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हिंदुत्वाच्या लाटेत दलितही सहभागी झाल्याचे स्पष्ट करण्यात आहे. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीत दलितांनी भाजपकडे आकर्षित होऊ नये म्हणून हरएक प्रयत्न करण्यात आले. पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. राज्यातल्या विधानसभेच्या 403 जागांपैकी मायावतींना केवळ 19 जागा जिंकता आल्या. याउलट भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांनी सव्वा तीनशे जागांपर्यंत मजल मारली. त्यात एकट्या भाजपच्या 312 जागा होत्या.
आता हिंदू धर्माचा त्याग करण्याची धमकी देऊन दलितांना हिंदू बनण्यापासून रोखण्याची महत्त्वाकांक्षी राजकीय चाल मायावतींनी खेळली आहे. मायावतींनी आपल्या सभांमध्ये दलितांच्या शोषणाचा मुद्दा ठासून मांडत आहेत. हा मुद्दा उपस्थित करताना दलितांचे शोषण सरकारी यंत्रणा नाही, तर हिंदू धर्माला मानणारे लोक करत असल्याचे मायावती आपल्या सभांमधून सांगत आहेत. हिंदू धर्माचा त्याग करण्याची धमकी देऊन मायावती दलित मतदारांना फकत एकच संदेश देत आहेत. दलितांनी हिंदूच्या लाटेत वाहून जाण्याची आवश्यकता नाही. यदाकदाचित पुढे अशीही परिस्थिती येऊ शकते की त्यांनाही हिंदू धर्म सोडावा लागेल. मायावतींनी धमकी देऊन बाण सोडलाय खरा, परंतु, हा बाण जिव्हारी लागणार केव्हा हे कळण्यासाठी किती वेळ थांबावे लागेल, हे त्यांनाच माहीत.उत्तरप्रदेशातील सध्याचे राजकिय वातावरण पाहता भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. योगी आदिनाथ सत्तेवर येऊन काही महिन्यांचाच कालावधी झाला आहे. पुढे योगींनी दलितोपयोगी निर्णय घेतल्यास मायावतींसाठी ही धमकी दिवास्वप्नच असेल.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117