चिनावल : गावातल्या लोकाले कामाले सांगा, नाहीत तुमचे वावरं असे कामातून जातीन’, ‘तुम्ही भारी भरताना पावर्यावर आता मरतीन ते साले’ व ‘गावातल्या लोकायले कामाले सांगता नाही, बाहीर गावाच्या लोकायले सांगता, पावर्यायले पयसे देता, गावातल्या लोकाले नाही’ अशा धमकीवजा तीन चिठ्ठ्या लावून केळी उत्पादक शेतकर्याच्या शेतातील केळी घड कापण्यात आल्याचा प्रकार रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे नुकताच घडला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी अतुल श्रीराम महाजन (32, कुंभारखेडा) यास सावदा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, कामातून कमी करण्यात आल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
वाढत्या चोर्यानंतर पोलिस प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर
सावदासह चिनावल व नंतर कुंभारखेडा भागात शेतकर्यांच्या शेती साहित्याच्या चोरीसह केळी घडांचे नुकसान केले जात असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच कुंभारखेडा येथील अनिल पाटील यांच्या बागेतील केळीचे 30 घड कापून फेकल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती विशेष म्हणजे यावेळी चोरट्याने केळी घडाला चिठ्ठी चिटकवून स्थानिक मजुरांच्या हाताला काम देण्याची मागणी केली होती अन्यथा अशाच पद्धत्तीने नुकसान करण्याचा इशारा दिला होता. या प्रकाराची सावदा पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत गोपनीय माहितीच्या आधारावरून कुंभारखेडा येथील अतुल श्रीराम महाजन (32, कुंभारखेडा) यास अटक केली आहे. सावद्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.