धम्मभूमी बांधकाम परवानगीच्या मागणीसाठी आंदोलन

0

बुद्धविहार कृति समिती, धम्मभूमी सुरक्षा समिती तसेच आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती

बोर्डाचे प्रभारी कार्यालय अधिक्षक पंढरीनाथ शेलार यांनी केली चर्चा

देहूरोड : देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून बांधकाम परवाना मिळावा, या मागणीसाठी येथील बुध्दविहार कृति समिती, धम्मभूमी सुरक्षा समिती आणि पंचक्रोशीतील आंबेडकरी अनुयायांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालुन या आंदोलनाची सुरूवात झाली. कृति समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, विजय पवार, फुले-शाहु-आंबेडकर विचारमंचचे धर्मपाल तंतरपाळे, महिला सुरक्षा समितीच्या संगिता वाघमारे, मंदाकिनी भोसले, सुरक्षा समितीचे अशोक गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, प्रकाश कांबळे आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह आंदोलक आंदोलनात सहभागी झाले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी कार्यालय अधिक्षक पंढरीनाथ शेलार, सुनिल गुरव, अविनाश चौधरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.

दोन वर्षांपासून मागणी प्रलंबित

धम्मभूमी ही केवळ राज्यामधीलच नव्हे तर देशातील ऐतिहासिक वास्तू आहे. रेडझोनचे कारण पुढे करून त्याच्या विकासाला प्रशासनाकडून बाधा आणली जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धर्मांतरित होण्यापुर्वी या ठिकाणी स्वहस्ते बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना केली. तसेच देशातील तीन ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक हे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी विशेष बाब म्हणून विकासासाठी परवानगी देण्याची मागणी मागील दोन वर्षांपासून संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. प्रशासनाकडून यासाठी पाठपुरावा केला जात नाही, असा आरोप करून तावतोब हि परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

लाखो अनुयायांची उपस्थिती

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी धम्मभूमीच्या वर्धापनदिनासाठी राज्यातून व परराज्यातून लाखो बौध्द अनुयायी येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून अन्नदान, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, धम्मभूमीच्या परिसरात प्रकाश व्यवस्था, फिरता दवाखाना, आगीचा बंब, परिसराची स्वच्छता व सफाई आदी सुविधा पुरविण्यात येत नाहीत. बोर्डाकडून अन्य संतांच्या कार्यक्रमासाठी ठराव करून याबाबी पुरविल्या जातात. त्याच धर्तीवर येथेही या सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी कार्यालय अधिक्षक पंढरीनाथ शेलार, सुनिल गुरव, अविनाश चौधरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, याप्रकरणी आश्‍वासन देण्याचे अधिकार नसल्याने याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी घेतील असे त्यांनी आंदोलकांना सांगितले. दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे दाखल झालेल्या केंद्रीय समितीला भेटण्यासाठी बोर्डाचे मुख्य कार्यकारी गेले असल्याने पुढील दोन दिवस ते उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे शेलार यांनी सांगितले.