जळगाव । धरणगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नांदेड, रोटवद या गावाच्या शिवेवरुन जाते. या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. बर्याच वर्षापासून ही पाईपलाईन गळते आहे. गळती थांबविण्यासाठी धरणगाव नगरपालिकेकडे अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र मागणीची दखल घेण्यात आले नसल्याने अखेर जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे पाण्याचा होणारा अपव्यय थांबविण्याची मागणी केली आहे.
पाईपलाईन ज्या शेतातुन गेली आहे त्या शेतकर्यांच्या शेतात पाणी शिरल्याचे मोठे नुकसान होत आहे. शहराला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून रोज सुमार अडीच लाख लिटर पाण्याची नासाडी पाईपलाईनच्या गळतीमुळे होत आहे. संबंधीत शेतकर्यांच्या पिकांचे झालेले नुकसानीची भरपाई नगरपालिकेने करुन द्यावे अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.