धरणगावात राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्लाबोल !

0

राष्ट्रवादीच्या मिटकरींची गुलाबराव पाटलांवर टिका : नगराध्यक्ष निवडणूकीसाठी उद्या मतदान

धरणगाव: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. स्थानिक स्तरावर देखील महाविकास आघाडीचा प्रयोग केला जात आहे. मात्र धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने आहे. त्यामुळे राज्यात जरी शिवसेना-राष्ट्रवादीची मैत्री असेल मात्र धरणगावात दोन्ही मित्र एकमेकाविरोधात उभे ठाकले आहे. वीस वर्ष सत्तेत राहूनही ज्यांना धरणगाव शहराला मुलभूत सुविधा देता आल्या नाहीत. धरणगाव शहरावर शिवसेनेची इडा पिडा असुन शहराच्या विकासासाठी बळीरूपी राष्ट्रवादीची सत्ता आणा असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आज शिवसेनेसह माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उद्या दि. 29 रोजी मतदान होणार आहे.

राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेचे भागीदार आहेत. असे असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र अद्यापही या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये हमरीतुमरी सुरूच आहे. धरणगाव नगराध्यक्ष पदासाठी दि. 29 रोजी निवडणूक होत आहे. धरणगाव पालिकेत शिवसेनेचे 13 तर भाजपाचे सहा नगरसेवक आहे. राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसतांनाही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या आदेशानुसार निलेश चौधरी यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी कायम ठेऊन शिवसेनेला आव्हान दिले आहे. निलेश चौधरी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी शिवसेनेचे माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील आणि पालिकेतील शिवसेनेच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. अमोल मिटकरी आपल्या भाषणात म्हणाले की, सत्ताधारी शिवसेनेला नव्या वर्षांत त्यांची जागा दाखवा. शहराचा विकास करायचा असेल तर प्रथम शहरातली राजकीय घाण साफ करा. ऐशी वर्षाचा तरुण नेता अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीला एकदा सत्तेची चाबी देवून पहा असे आवाहन अमोल मिटकरी यांनी येथे केले.

धरणगाव शहरात गल्लोगल्ली घाणिचं साम्राज्य वाढले आहे. गटारी तुंबलेल्या आहेत. वीस वीस दिवस नळाला पाणी येत नाही, शहरातल्या तलावांची कामं रखडलेली आहेत. व्यसनाधीनता वाढली आहे. नकली दारु तरुणांचा घात करत आहे. मात्र, हे येथील निर्ढावलेले सत्ताधारी नेते आणि जनतेच्या सोशिकपणामुळे होतेय असे मिटकरी म्हणाले. भाजप-सेना यांना त्यांची जागा दाखवा व उद्याचा सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

देवकरांनीही डागली तोफ
या सभेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. आपण सोडलेली अर्धवट कामं देखील गुलाबराव पाटील पूर्ण करु शकले नाहीत अशी टीका त्यांनी केली. माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांनी पाणी समस्येवर घणाघाती हल्ला केला. बालकवी स्मारक, क्रीडा संकुल, रस्ते, तलाव या रखडलेल्या कामांची त्यांनी जंत्रीच वाचून दाखवली. स्वतः उमेदवार निलेश चौधरी यांनी आपण माघार घेणार नाही व पैसे वाटणार नाही असे आश्वासन दिले. याची खात्री देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या एकुलत्या एक मुलाची व्यासपिठावर शपथ घेतली. मी गरीब उमेदवार आहे. हमाली करणार्‍या बापाचा मुलगा आहे मात्र शरदचंद्रजी पवार यांनी आपल्या प्रामाणिकपणाकडे पाहून उमेदवारी दिली हीच आपली श्रीमंती असल्याचे नमूद केले. नगरसेवक नसले तरी स्व हिमतीने मी शहराच्या विकासाचे निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यांची होती उपस्थिती
सभेत माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संजय सोनवणे, ओंकार माळी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पुष्पाताई महाजन, उमेश नेमाडे, योगेश देसले, डॉ. मिलिंद डहाळे, संभाजी कंखरे, धनराज माळी, नागेश्वर पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केली. सुरवातीला सपक वाटणार्‍या या निवडणुकीत सानेपटांगणावर झालेल्या या सभेने रंगत भरली आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.