धरणगाव तालुक्यातील हिंगोणा येथील नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

0

जळगाव। धरणगांव तालुक्यातील जवखेडा-हिंगोणा येथे 22 वर्षीय विवाहितेचा रविवारी सकाळी संशयास्पद मृत्यू आहे. विवाहितेच्या माहेरवासियांनी हा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दुपारी जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत शवविच्छेदन करून देणार नाही असा पवित्रा घेतला होता. पाळधी पोलिसांनी नातेवाईकांशी समजूत घातल्यानंतर अखेर दुपारी महिलेच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. आशाबाई सुनिल कोळी असे मयत विवाहितेचे नाव आहे.

गुरूवारीच परतली होती सासरी
गेल्या महिन्यातील 18 मार्च रोजी आशाबाई हिचे लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वीच ती माहेरी आली होती त्यानंतर ती गुरूवारी पुन्हा हिंगोणा येथे सासरी परतली. आज रविवारी सकाळी आशाबाई हिचा मृत्यू झाला परंतू सासरच्या मंडळींनी आशाबाई हिचा मृतदेह पोलिस पंचनामा न होताच धरणगांव सामान्य रूग्णालयात नेले. त्यानंतर नातेवाईकांना आशाबाई हिने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना कळविले. माहेरवासींयानी तसेच नातेवाईकांनी धरणगांव गाठल्यानंतर त्यांना आशा हिच्या गळ्यावर गळफासचे कोणतेही वळ दिसत नसल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. पाळधी व धरणगाव पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी विवाहितेचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात गर्दी
जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी या ठिकाणी एकच गर्दी करत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जिल्हा रूग्णालयात पाळधी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख आल्यावर नातेवाईकांनी त्यांना घेराव घालून ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी उशीने तोंड दाबून घातपात केल्याचा आरोप त्यांनी केला. सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल केल्यावरच शवविच्छेदन करू देवू अशी आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतली. मात्र, विजय देशमुख यांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर विवाहितेच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, महिलेचे मृत्यूचे कारण अद्याप समजून आलेले नाही. आशाबाई यांच्या पश्‍चात आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.