धरणगाव पं.स.च्या विस्तार अधिकार्‍यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

दोन हजारांची लाच भोवली ; नोटीसबाबत अनुकूल अहवालासाठी मागितली लाच

भुसावळ : धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रुक ग्रामपंचायतीतील तक्रारदार शिपाई यांना 2015-2016 या वित्तीय वर्षात जादा वेतन दिले गेल्याने जादा देण्यात आलेली रक्कम परतफेड करण्याबाबत तक्रारदार यांना नोटीस आल्याने या नोटीसीबाबत अनुकूल अहवाल जळगाव जिल्हा परीषदेला पाठवण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच मागणार्‍या धरणगाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे, (51, रा.गंगूबाई नगर, पारोळा, जि.जळगाव) व कंडारी बुद्रूक, ता.धरणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (45, रा. बोरोले नगर, चोपडा) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

चोपड्यासह धरणगावात कारवाई
37 वर्षीय तक्रारदाराकडे आरोपींनी 28 ऑगस्ट रोजी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. संशयीत ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनी चोपडा शहरातील हॉटेल मानसीमध्ये सोमवारी दुपारी तीन वाजता लाचेची रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर लाच प्रकरणात विस्तार अधिकारी सुरेश कठाळे यांचाही सहभाग असल्याने त्यांना धरणगाव पंचायत समितीतून अटक करण्यात आल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.